esakal | राजधानी आणखी आठवडाभर 'लॉक', मुख्यमंत्र्यांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

राजधानी आणखी आठवडाभर 'लॉक', मुख्यमंत्र्यांची घोषणा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लॉकडाउन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. 17 मे 2021 पर्यंत दिल्लीतील लॉकडाउन वाढवण्यात आल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. पुढील आठवडाभर दिल्लीतील मेट्रो सुविधा बंद करण्यात आल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मागील दोन-तीन दिवसांपासून दिल्लीतील रुग्णसंख्या 35 टक्क्यावरुन 23 टक्केवर आल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. लॉकडाउनच्या काळा राजधानीमधील आरोग्य व्यवस्था तसेच विविध ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहेत. दिल्लीतील ऑक्सिजनची परिस्थिती सध्या सुधारत आहे. तसेच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आम्ही पॅनिक झालो नाहीत. त्यावर उपाय शोधत असल्याचेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं.

दिल्लीमध्ये लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाची मोठी आणि उत्कृष्ट तयारीही करण्यात आली आहे. लसीकरणात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. राजदानी दिल्लीमध्ये सध्या लसींचा तुटवडा आहे. मात्र, केंद्र सरकार आम्हाला मदत करेल, असा विश्वास यावेली केजरीवाल यांनी व्यक्त केला. येत्या ३ महिन्यांमध्ये सर्वच वयोगटांतील दीड कोटी दिल्लीकरांना लसीकरण पूर्ण करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. मात्र त्यासाठी दिल्लीला केंद्राकडून दररोज ३ लाख म्हणजेच एकूण ३ कोटी डोस लागतील, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

गेले किमान २५ दिवस दिल्लीत रुग्णसंख्येचा जो विस्फोट झाला होता, त्याचा उतरता कल आता दिसू लागला आहे. गेल्या २४ तासात नवीन रुग्णसंख्या २० हजारांवरून १८ हजारांच्या आसपास स्थिरावली. मात्र मृत्यूसंख्या अजूनही साडेतीनशे ते ४०० च्या घरातच आहे. सध्याच्या परिस्थितीत वेगवान लसीकरण हाच कोरोनाला रोखण्यासाठीचा उपाय आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी दिल्लीला ऑक्‍सिजनचा पुरेसा पुरवठा करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचे कान उपटल्यावर तो प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण होत नाही, तोच आता दिल्लीत पुरेशा लसमात्रांच्या पुरवठ्याचा प्रश्न उग्र होऊ लागला आहे. दिल्लीत कोरोना लशींची कमतरता असल्याचे चित्र रोज दिसत आहे.