Private Jet and Helicopter : खासगी विमाने व हेलिकॉप्टरच्या मागणीत वाढ होणार

निवडणुकीदरम्यान विमानांच्या तुलनेत हेलिकॉप्टरला अधिक पसंतीची शक्यता
खासगी विमाने व हेलिकॉप्टरच्या मागणीत वाढ होणार
खासगी विमाने व हेलिकॉप्टरच्या मागणीत वाढ होणार Sakal

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राजकीय पक्षांची प्रचारासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदा मागील सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरच्या मागणीत ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज या उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

यावेळी ग्रामीण, निमशहरी भागात प्रचारावर भर दिल्याने, या भागात हेलिकॉप्टर सहज आणि कमी वेळेत पोहोचू शकते, त्यामुळे विमानांच्या तुलनेत हेलिकॉप्टरला अधिक मागणी असण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

‘क्लब वन एअर’चे सीईओ राजन मेहरा म्हणाले, ‘‘चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरच्या उपलब्धतेपेक्षा यंदा मागणी जास्त असेल. राजकीय नेते छोट्या शहरांमध्ये जाण्यासाठी हेलिकॉप्टरची निवड मोठ्या प्रमाणात करतील आणि त्यामुळे हेलिकॉप्टरची मागणी अधिक होण्याची शक्यता आहे, असे यांनी सांगितले.

बिझनेस एअरक्राफ्ट ऑपरेटर असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन आर. के. बाली यांच्या मते, लोकसभा निवडणुकीदरम्यान, खासगी चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरची मागणी मागील निवडणुकीच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. प्रति तास शुल्कातही वाढ होण्याचा अंदाज आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काही मध्यस्थ त्यांच्या ग्राहकांसाठी भाडेतत्त्वावरील विमाने आणि हेलिकॉप्टरची आगाऊ नोंदणी करत आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टरचे तासाचे दर लक्षणीयरित्या वाढले आहेत.

चार्टर्ड हेलिकॉप्टर सुमारे दीड लाख रुपये प्रति तास दराने भाड्याने घेतले जात आहे. काही ठिकाणी, तासाचे दर ३.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. चार्टर्ड विमानासाठीचा दर प्रति तास ४.५ लाख ते ५.२५ लाख रुपयांपर्यंत असू शकतो, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

देशात ११२ खासगी विमान कंपन्या (नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर) आहेत. यांचे ठराविक वेळापत्रक नसते आणि जेव्हा गरज असते तेव्हा ते उड्डाण करतात. सध्या देशात अशा कंपन्यांकडे हेलिकॉप्टरसह सुमारे ४५० विमाने आहेत.

खासगी कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्यांकडे एक किंवा दोन विमाने किंवा हेलिकॉप्टर आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार, या कंपन्यांकडील विमान आणि हेलिकॉप्टरची आसन क्षमता किमान तीन ते कमाल ३७ पर्यंत आहे. बहुतेक हेलिकॉप्टरची आसन क्षमता दहापेक्षा कमी आहे. विमानांमध्ये फाल्कन २०००, बम्बार्डियर ग्लोबल ५०००, सेस्ना आदी प्रकारच्या विमाने, हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.

भारतीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पक्षांच्या २०१९-२० मधील वार्षिक लेखापरीक्षण अहवालानुसार, सत्ताधारी भाजपने विमान, हेलिकॉप्टरवर एकूण २५० कोटींहून अधिक खर्च केला आहे, तर याच काळात काँग्रेस पक्षाने निवडणुकीत १२६ कोटी रुपये खर्च केले होते. पक्षाने हेलिकॉप्टरच्या खर्चाचा वेगळा तपशील दिलेला नाही. यंदाही आतापर्यत झालेल्या नोंदणीनुसार, भाजपने विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी सर्वाधिक नोंदणी केली आहे,

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकूण खर्च सुमारे १.२० लाख कोटी रुपये अपेक्षित आहे. यातील फक्त २० टक्के खर्च निवडणूक आयोगाचा असेल.यात नव्या ईव्हीएम यंत्रांचा खर्च समाविष्ट नाही. उर्वरित खर्च राजकीय पक्ष, उमेदवार यांचा असेल.

- एन. भास्कर राव, निवडणूक विश्लेषक

ठळक वैशिष्ट्ये...

  • दुर्गम भागात कमी वेळेत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी अधिक

  • उपलब्धतेपेक्षा मागणी अधिक, त्यामुळे दरवाढीचा अंदाज

  • देशात ११२ खासगी विमान कंपन्या, ४५० विमाने

  • आसनक्षमता तीन ते ३७

किमान शुल्कदर

हेलिकॉप्टरसाठी (प्रतितास) - दीड ते साडे तीन लाख रुपये

चार्टर्ड विमान (प्रतितास) - ४.५ ते ५.२५ लाख रुपये

पक्षांचा खर्च (वर्ष २०१९-२०)

भाजप

२५० कोटी रुपयांपेक्षा अधिक

काँग्रेस

१२६ कोटी रुपयांहून अधिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com