Desh : मतभेद असू शकतात पण मनभेद नाहीत ; मौलाना महमूद मदनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maulana Mahmood Madani

Desh : मतभेद असू शकतात पण मनभेद नाहीत ; मौलाना महमूद मदनी

नवी दिल्ली : देशात धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाऊ नये, असे सांगतानाच आम्हाला भाजप आणि आरएसएस यांच्यापैकी कोणाबद्दलही अडचण नाही. आमच्यात मतभेद असू शकतात, पण मनभेद (मतभिन्नता) नाही असे जमियत-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी आज सांगितले.

दिल्लीच्या रामलीला मैदानावरील अधिवेशनात देशाच्या अनेक राज्यांतून आणि परदेशातूनही आलेल्या जमियतच्या हजारो प्रतिनिधींसमोर बोलताना मदनी म्हणाले, की एका धर्माचे ग्रंथ दुसऱ्या धर्मावर लादू नयेत. कारण तसे करणे आमच्यासाठी अस्वीकार्य आहे. आरएसएस आणि भाजपसोबत आमचा कोणताही धार्मिक संघर्ष नाही.

आमच्या दृष्टीने हिंदू आणि मुस्लिम समान आहेत, आम्ही माणसा माणसांमध्ये फरक करत नाही. जमीयत-ए-उलेमाचे धोरण हे आहे की भारतातील सर्व नागरिक समान आहेत, त्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव करू नये.

मदनी म्हणाले, की आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालकांना यासाठी बोलावले की परस्परांतील भेदभाव आणि वैर विसरून व एकमेकांना आलिंगन देऊन देशाला जगातील सर्वात शक्तिशाली देश बनविण्याचे आवाहन करावे. आमची सनातन धर्माविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, तुमचीही इस्लामविरुद्ध तक्रार नसावी, हेही स्पष्ट करण्यासाठी आम्ही मोहन भागवत यांना निमंत्रित केले.

मोदी सरकारने पसमांदा मुस्लिमांच्या साठी ज्या योजना आणल्या त्याचे स्वागत करून मदनी म्हणाले, की आमच्या सरकारने पसमांदा मुस्लिमांसाठी चांगल्या घोषणा केल्या आहेत, आम्ही त्याचे वर्णन ‘देर आए दुरुस्त आए‘ असे करतो. अनेक हक्कांपासून वंचित असलेल्या या लोकसंख्येचा मोठा वर्ग जातीच्या आधारावर विभागला जाऊ नये. इस्लाम देखील याची परवानगी देत ​​नाही. मौलाना मदनी यांनी भूकंपग्रस्त तुर्कस्तानला मदत पाठवल्याबद्दल केंद्र सरकारचे कौतुक केले.

मदनी म्हणाले की, आमच्या सरकारने ज्या पद्धतीने मदत पाठवली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. सरकारने हे केवळ देखावा करण्यासाठी किंवा आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी केले नाही तर मदत पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. भारताचे इस्रायलबद्दलचे बदललेले परराष्ट्र धोरण फायदेशीर नाही. इस्राईलकडे भारताचा यू-टर्न अल्पकालीन लाभ मिळवू शकतो, परंतु दीर्घकाळासाठी फायदेशीर नाही असा इशारा त्यांनी दिला.

मुस्लिम समाज हा भारतावरील ओझे नाही. आजही अरब देशांतून ४ ते ५ अब्ज डॉलरचा वित्तपुरवठा होतो. हा पैसा जे भारतात पाठवितात, त्यापैकी ७० टक्के मुस्लिम आहेत. देशातही अनेक अडचणी असूनही मुस्लिम कारागीर आणि व्यापारी देशाच्या जीडीपीत योगदान देत आहेत.

- मौलाना महमूद मदनी, अध्यक्ष, जमियत-उलेमा-ए-हिंद