
Desh : भाजपमुळेच त्रिपुराचा विकास : मोदी
अम्बासा (त्रिपुरा) ः ‘‘ त्रिपुरामध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर कायद्याचे राज्य स्थापित झाले असून याआधी डाव्या पक्षांचे कार्यकर्ते पोलिस ठाणी स्वतःच्या ताब्यात घेत असत,’’ असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्बासा येथे आयोजित सभेत बोलताना केला. काँग्रेस आणि डाव्यांच्या राजवटीने गेली अनेक दशके या भागाचा विकास रोखून धरला होता. भाजपनेच राज्यामध्ये विकास आणल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोदी म्हणाले की, ‘‘ हिंसाचार ही आता त्रिपुराची ओळख राहिलेली नाही. भाजपने या राज्याला हिंसाचार आणि भीतीपासून मुक्त केले आहे. राज्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला असून लोकांचे आयुष्य देखील सुकर झाले आहे.’’ प्रद्योत विक्रम माणिक्य देव वर्मा यांच्या नेतृत्वाखालील तिप्रा मोथा पक्षाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, ‘‘ काही पक्ष हे मागच्या दाराने विरोधकांना मदत करत होते.
आता त्यांना मतदान केले तर ते राज्याला अनेक वर्षे मागे घेऊन जातील. आताही कुशासनाच्या जुन्या खेळाडूंनी परस्परांशी हातमिळवणी केली आहे. त्यांना काही पक्ष हे मागच्या दाराने मदत करत आहेत. त्यांची नावे अथवा घोषवाक्ये काहीही असोत पण आता एकही मत त्यांना पडता कामा नये याची काळजी जनतेने घ्यावी.’’
डबल इंजिनचे सरकार हवे
काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आदिवासींमध्ये फूट पाडण्याचे काम केले, भाजपने मात्र त्यांना जोडण्याचे प्रयत्न केले, यामध्ये ब्रू जमातीचा देखील समावेश होता. देशातील आदिवासींच्या उत्थानाचे काम भाजप करतो आहे. राज्यात विकासाची गती कायम ठेवायची असेल तर डबल इंजिनचे सरकार सत्तेत असणे गरजेचे आहे. काँग्रेस आणि डाव्यांची दुधारी तलवार ही लोकांच्या विकासाच्या योजना रोखू पाहते आहे, असे मोदी म्हणाले.
विकासकामांचा दाखला
भाजपने त्रिपुराची खंडणीच्या संस्कृतीमधून मुक्तता केली असून तुमची मते ही डाव्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम करतील. यामुळे डबल इंजिनचे सरकार त्रिपुरामध्ये सत्तेवर येईल, असे मोदींनी सांगितले. मोदींनी यावेळी राज्यात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचाही दाखला दिला. राज्यामध्ये पाच हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले असून आगरतळा येथे नवे विमानतळ उभारण्याबरोबरच ऑप्टिकल फायबरचे जाळेही विस्तारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.