स्वच्छतेच्या सवयी लावून घ्या; धोका कायम असल्याचा मोदींचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जून 2020

कोरोनाविरुद्धची लढाई सुरू असतानाच देशाचे अर्थचक्र हळूहळू गतिमान होत आहे.अर्थव्यवस्थेचा मोठा भाग मोठ्या मुश्किलीने खुला होत आहे.मात्र या महामारीचा जीवघेणा धोका अजूनही कायम आहे.

नवी दिल्ली - कोरोनाविरुद्धची लढाई सुरू असतानाच देशाचे अर्थचक्र हळूहळू गतिमान होत आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा भाग मोठ्या मुश्किलीने खुला होत आहे. मात्र या महामारीचा जीवघेणा धोका अजूनही कायम आहे. दो गज की दूरी, मास्क लावणे, वारंवार हात धुणे यासारख्या सवयी कायमच्या अंगी बाळगूनच पुढची वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. कोरोना लढाईमध्ये योग आणि आयुर्वेद यांचे फार मोठे महत्त्व आहे असे सांगताना त्यांनी ‘माय लाईफ माय योग’ या जागतिक स्पर्धेची घोषणा केली आणि प्रत्येकी तीन मिनिटे योग करतानाचा आपला व्हिडिओ आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘मन की बात’ या आकाशवाणी कार्यक्रमात बोलताना मोदींनी कोरोना लॉकडाउनमुळे देशातील कष्टकरी मजूर आणि गरिबांचे अतोनात हाल झाल्याचे मान्य केले. स्वातंत्र्योत्तर काळात पूर्व भारत विकासापासून वंचित राहिला होता. त्याच्या विकासाची तीव्र गरज या संकटाने दाखवून दिल्याचेही सांगितले. लॉकडाउनचा चौथा टप्पा संपल्यावर ‘अनलॉक - १’ ला उद्यापासून ( १ जून) सुरवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत मोहिमेचे नेतृत्व आता देशवासीयांनी आपल्या हाती घेतले आहे. व्होकल फाॅर लोकल, मेक इन इंडिया, स्टार्ट अप सारख्या आर्थिक योजनांना देशाच्या अनेक ठिकाणांहून बळ मिळते आहे. पेट्रोल-डिझेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू , खाद्यतेल आदींची आयात कमीत कमी करून त्याचा पर्याय आम्ही आपल्या देशातच सहजपणे निर्माण करू शकतो, असा विश्वास जागृत होतो आहे. आमची लोकसंख्या जगातील बहुतांश देशांपेक्षा जास्त आहे. आमची आव्हानेही मोठी आहे पण कोरोना फैलाव आणि मृत्युदर कितीतरी कमी राखण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पंतप्रधान म्हणाले... 
- आमची गावे, जिल्हे, राज्ये आत्मनिर्भर असती तर अनेक समस्या कमी झाल्या असत्या 
- देशाच्या विकासाचे इंजिन बनण्याची क्षमता पूर्व भारतात 
- कोरोना संकटाने गावागावात स्वयंरोजगाराच्या अनेक संधीही खुल्या 
- देशवासीयांच्या संकल्पशक्तीमुळेच कोरोनापासून देश बऱ्याच प्रमाणात वाचवू शकलो 
- देशवासीयांच्या सेवाशक्तीचे दर्शन या महासंकटात घडले 
- श्रमिकांना आपापल्या गावी पोहोचवणारे रेल्वे कर्मचारी हेदेखील कोरोनायोद्धेच आहेत 
- संशोधन आणि नवाचार यांचे अद्भुत दर्शन भारतीयांनी या संकटकाळात घडवले. 
- आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थींची संख्या १ कोटी झाली. 
- जागतिक पर्यावरण दिनाची यंदाची थीम जैवविविधता आहे. 
- निसर्ग रक्षणासाठी संकल्प करणे, हे प्राधान्य हवे 

आयुर्वेद आणि योग 
कोरोना संकटात आपण ज्या अनेक जागतिक नेत्यांशी बोललो त्यापैकी प्रत्येकाने योग आणि आयुर्वेद याबाबत आपल्याकडे विचारणा केली, असे नमूद करून मोदी म्हणाले की आयुर्वेद आणि योग यासंदर्भात हरिद्वारपासून हॉलीवूडपर्यंत वाढती जिज्ञासा दिसत आहे. कोरोना विषाणू जी प्रतिकारशक्ती कमी करतो ती वाढवण्याची क्षमता कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी यासारख्या अनेक योग क्रियांमध्ये आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजेंद्र जाधव यांचा विशेष उल्लेख 
पंतप्रधान म्हणाले की, या संकटात सर्वाधिक फटका गरिबांना बसला, ज्यांच्या यातना शब्दांच्या पलीकडच्या आहेत. या गरिबांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. अगरतळ्यात एका टपरीधारकाने केलेली मदत, भिक्षा मागून गरिबांना मदत करणाऱ्या राजू, तसेच आपल्या ट्रॅक्टरलाच सॅनिटायझर फवारणीचे माध्यम बनवणारे सटाण्याचे शेतकरी राजेंद्र जाधव यांचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Develop hygiene habits says PM Narendra modi in Mann ki Baat