'...तोपर्यत सुशांतचे प्रकरण सोडणार नाही', बिहार प्रचारात फडणवीसांचे वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 14 September 2020

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बिहारमधील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या कामाला लागले आहेत.

नवी दिल्ली- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बिहारमधील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या कामाला लागले आहेत. यादरम्यान, त्यांना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि सुशांत सिंह राजपूतप्रकरणी काही प्रश्व विचारण्यात आले होते. कंगना बिहारमध्ये भाजपचा प्रचार करेल का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की,"बिहार निवडणूक प्रचारासाठी कंगनाची काहीही आवश्यकता नाही. कारण, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे स्टार प्रचारक आहेत". 

प्रशांत भूषण यांनी १ रुपयाचा दंड भरला, पण फेरविचार याचिका दाखल करणार

देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी बिहारमधील कटिहार येथे पोहोचले. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कंगना रनौतसारख्या स्टार प्रचारकाची आम्हाला गरज नाही. स्वत: पंतप्रधान मोदी स्टार आणि स्टार प्रचारक आहेत. त्यांच्यामुळे आम्ही देशात दोनदा विजय प्राप्त केला आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही इतर कोठेही विजय प्राप्त करु शकतो, असं फडणवीस म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा मुद्दा राजकारणाचा मुद्दा नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सुशांत राजपूत-रिया चक्रवर्ती भाजपच्या निवडणुकीचा मुद्दा नाही. पण, आम्ही हे विसरलो नाही आणि विसरणारही नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही, असं ते म्हणाले आहेत. 

टिकटॉकच्या खरेदीसाठी भिडू मिळाला; कारभार नव्या कंपनीच्या हाती

बिहारचे नाही, तर देशाचे पुत्र होते सुशांत

सुशांत सिंह बिहारचे नाही, तर देशाचे पुत्र होते. या उभरत्या कलाकाराच्या मृत्यूनंतर लोकांना वाटत होतं की, आता त्याला न्याय मिळणार नाही. मात्र, माध्यमांनी चालवलेल्या मोहिमेचा फायदा झाला, असं फडणवीस म्हणाले. कंगना रनौतने मुंबईला पीओके म्हटलं होतं, तिचं हे वक्तव्य अयोग्य असल्याचं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र सरकार बदला घेण्याच्या भावनेने काम करत आहे. सरकारने कंगनाचे घर उद्वस्त केले. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार कोरोनाविरोधात नाही, तर कंगनाचा सामना करत असल्याचं ते म्हणाले.

कंगना आणि शिवसेनेमध्ये वादावादी

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आणि शिवसेनेवर टीका केली आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. त्यामुळे वाद वाढला होता. त्यानंतर शिवसेना आणि कंगनामध्ये वाद उभाळला. कंगना ज्या दिवशी मुंबईत आली, त्या दिवशी बीएमसीने तिचे मुंबईतील ऑफीस तोडले होते. त्यांनतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. कंगनाने उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanvis on bihar election sudhant singh rajput issue