सहा वर्षांत गरीबांसाठी प्रचंड काम केलं- नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 9 September 2020

देशात मागील सहा वर्षांतील आपल्या शासनकाळात गरीबांसाठी जेवढे काम झाले तेवढे कधीही झालेले नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.

नवी दिल्ली- देशात मागील सहा वर्षांतील आपल्या शासनकाळात गरीबांसाठी जेवढे काम झाले तेवढे कधीही झालेले नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. ‘पंतप्रधान स्वनिधी संवाद’ कार्यक्रमात मध्य प्रदेशातील पदपथावरील किरकोळ विक्रेत्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.

प्रत्येक देशवासीयाचे जगणे सुलभ व्हावे व तो आत्मनिर्भर बनावा असे आपल्या सरकारचे प्रयत्न आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की आमच्या देशात गरीबांसाठी अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या पण त्यांच्यासाठी काम मात्र झाले नाही. प्रत्येक क्षेत्रातील गरीब, पीडित व शोषितांसाठी सरकारच्या योजना आधार बनल्या आहेत. देशातील गरीब माणूस स्वातंत्र्यानंतरची सहा दशके बॅंकेत जाण्यासही घाबरत असे. पण आता जनधन योजनेच्या माध्यमातून सरकारने ४० कोटी गरीबांची बॅंक खाती उघडून दिली आहेत व त्याद्वारे त्यांना सुलभपणे कर्ज, घरकुल योजनेचे लाभ व आर्थिक मदत मिळू लागली आहे.

अभिमानास्पद! अभूतपुर्व योगदानाबद्दल स्पेसक्राफ्टला दिले कल्पना चावलाचे नाव

पंतप्रधानांनी सांगितले की कोरोनाच्या काळात रोजीरोटीची भ्रांत निर्माण झालेल्या गरीब विक्रेते व व्यावसायिकांना पुन्हा रोजगार निर्माण व्हावा, त्यांना आपले जीवन पुन्हा सुरू करता यावे यासाठीच स्वनिधी योजना सरकारने आणली आहे. फिरत्या विक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खासगी सावकारांकडे जादा दराने व्याजावर पैसे घेण्याची वेळ येऊ नये यासाठी या योजनेत सुलभपणे आर्थिक मदत-कर्ज देण्याची तरतूद आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, सरकारने शहरांमध्ये आपल्यासारख्या मित्रांसाठी अत्यंत कमी किरायामध्ये चांगले घर उपलब्ध करुन देण्यासाठीही एक मोठी योजना सुरु केली आहे. एक देश, एक राशन कार्ड योजनेमुळे तुम्ही जगभरात कोठेही गेलात, तरी तुम्हाला राशन नक्की मिळेल. 

2021 च्या नोबल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांचे नामांकन

कोरोना महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. पण, आता लॉकडाऊन हळूहळू उठवला जात आहे. तुम्हीही आता पुन्हा आपला व्यवसाय सुरु करत आहात. तेव्हा तुम्हाला काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमचे आणि तुमच्या ग्राहकांची काळजी घ्यावी लागणार आहे. मास्क वापरणे, स्वच्छता ठेवणे, दोन मिटरचे अंतर ठेवणे यासारख्या गोष्टींचे तुम्हाला पालन करावे लागणार आहे, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: did a lot for the poor in six years said pm Narendra Modi