अफगाण-तालिबानमध्ये प्रत्यक्ष वाटाघाटी आजपासून सुरू

वृत्तसंस्था
Sunday, 13 September 2020

आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलेल्या अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील ऐतिहासिक चर्चेला तब्बल एक महिन्याच्या विलंबानंतर आजपासून कतारमधील दोहा येथे सुरुवात झाली. तब्बल दोन दशकांच्या रक्तरंजित संघर्षानंतर हे दोन्ही पक्ष चर्चेच्या व्यासपीठावर एकत्र आले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी या चर्चेचे स्वागत केले असून ते देखील यात सहभागी झाले आहेत.

दोहा - आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलेल्या अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील ऐतिहासिक चर्चेला तब्बल एक महिन्याच्या विलंबानंतर आजपासून कतारमधील दोहा येथे सुरुवात झाली. तब्बल दोन दशकांच्या रक्तरंजित संघर्षानंतर हे दोन्ही पक्ष चर्चेच्या व्यासपीठावर एकत्र आले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी या चर्चेचे स्वागत केले असून ते देखील यात सहभागी झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिका आणि तालिबानने फेब्रुवारीमध्ये शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर या चर्चेचा मार्ग मोकळा झाला होता. विशेष म्हणजे या करारानंतर देखील अफगाणिस्तानात हिंसाचार सुरूच राहिल्याने प्रत्यक्ष चर्चेची प्रक्रिया सुरू होण्यात असंख्य अडथळे येत होते.

यांची भाषणे
दोहातील एका पंचतारांकित हॉटेलामध्ये यासाठी विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी अफगाणिस्तानातील राष्ट्रीय एकीकरण परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला, तालिबानचे उपनेते मुल्ला अब्दुल घनी बारदार आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांची भाषणे झाली. दोन संघर्षशील घटकांमधील वाटाघाटी मात्र सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन्ही घटकांनी प्रामाणिकपणे परस्परांच्या हातात हात घालून शांततेसाठी काम केल्यास देशातील सध्याचे अराजक संपुष्टात येईल. मानवतेसाठी आपण शस्त्रसंधी करायला हवी.
- अब्दुल्ला अब्दुल्ला, एकीकरण परिषदेचे प्रमुख

देशाने इस्लामी व्यवस्था स्वीकारायला हवी, अफगाणिस्तान हा स्वतंत्र विकसित देश व्हावा असे आमचे प्रामाणिक मत आहे. यामध्ये सर्व नागरिकांना त्यांचे प्रतिबिंब दिसू शकेल.
- मुल्ला अब्दुल घनी बारदार, तालिबानचे नेते

भविष्यात देशात नेमकी कोणती राजकीय व्यवस्था असावी याचा निर्णय अफगाणिस्तानलाच घ्यायचा आहे. शांतता निर्माण करण्यासाठी ही संधी दवडता कामा नये. ही चर्चा जगाला यशस्वी व्हावी असेच वाटते.
- माईक पॉम्पिओ, अमेरिका

दोन्ही पक्ष सैनिकांना सोडणार
सैनिकांच्या मुक्ततेवरून ही चर्चा पुढे जात नव्हती, तालिबानने त्यांच्या ताब्यातील एक हजार अफगाण सैनिकांना सोडण्याची तयारी दर्शविली असून त्याबदल्यात सरकार देखील पाच हजार तालिबानी कैद्यांना मुक्त करणार आहे. दरम्यान हिंसाचारामध्ये सहभागी असलेल्या सहा कैद्यांना सोडण्यास फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांनी विरोध केला होता. विशेष म्हणजे पाकिस्तानने देखील शांततापूर्ण मार्गाने होत असलेल्या या बोलणीचे स्वागत केले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Direct negotiations with the Afghan Taliban begin today