देशात 17 वर्षात लाखो कोटींचा भ्रष्टाचार; नावे उघड झाल्यास होणार राजकीय उलथापालथ

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 21 September 2020

भारतात घोटाळे करणारे नेते, भ्रष्ट आधिकारी, बँकांची फसवणूक करणारे उद्योगपती आणि भांडवलदार यांच्या माहितींची कागदपत्रे लिक झाली आहेत. यातील नावे उघड झाली तर देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: अमेरिकन सरकारच्या कोषागार विभागाच्या फायनान्शियल क्राइम्स एन्फोर्समेंट नेटवर्ककडे (FinCEN) भारतात घोटाळे करणारे नेते, भ्रष्ट आधिकारी, बँकांची फसवणूक करणारे उद्योगपती आणि भांडवलदार यांच्या माहितींची कागदपत्रे लिक झाली आहेत. यातील नावे उघड झाली तर देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिव्हेटिव जर्नलिस्ट (International Consortium of Investigative Journalists) चे सदस्य असणाऱ्या 88 देशांतील 109 माध्यम संस्थांना फिनसेन फायलींमधील नोंदवलेल्या कागदपत्रांतील माहिती मिळाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

इंग्रजी वृत्तपत्रचा दावा-
मिळालेल्या कागदपत्रांत 2 हजार गुप्त कागदपत्रांची तपसाणी केल्यानंतर अनेक भारतीयांची नावे पुढे आली आहेत. ज्यांनी मोठ्या प्रमाणावर पैशांचे अवैध व्यवहार केले आहेत. या कागदपत्रांमध्ये काही बँकांचीही नावे आहेत, ज्यांची मोठमोठ्या उद्योगपतींनी कर्जे घेऊन बुडवली असल्याचा दावा इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृतामध्ये करण्यात आला आहे. 

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; महाराष्ट्रातील खासदाराचा समावेश

फिनसेनच्या अत्यंत गुप्त कागदपत्रांमध्ये 2 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची माहिती आहे. या वृत्तपत्राने दावा केला आहे की या कागदपत्रांमध्ये ज्यांच्याविरूद्ध भारतातील विविध संस्था तपास करीत आहेत अशा लोकांच्या नावांची छाननी करण्याचा प्रयत्न केला. इंडियन एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार, फिनसेनच्या कागदपत्रांमध्ये भ्रष्टाचार आणि कर चुकवण्याच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेल्या लोकांची आणि कंपन्यांची नावे नोंदली गेली आहेत. ज्यात   2- जी घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा, रोल्स रॉयस लाच प्रकरण आणि एअरसेल-मॅक्सिस प्रकरण आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI), एन्फोर्समेंट डायरेक्टरेट (ED) आणि डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) या एजन्सी या प्रकरणांचा तपास करत आहेत.

कागदपत्रांमधून ज्यांची नावे समोर आली त्यामध्ये सध्या तुरुंगात असलेल्या काही तस्करांचा समावेश आहे. यात मौल्यवान आणि दुर्मीळ कलाकृतींची तस्करी करणाऱ्या रॅकेटमधील आरोपी आहेत. एका भारतीयाची आंतरराष्ट्रीय हिरे कंपनी, हेल्थ केअर आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधील एक प्रमुख उद्योग समुह, तसंच लिलाव करण्यात आलेल्या एका स्टील कंपनीचा समावेश आहे. याशिवाय बड्या उद्योगपतींची फसवणूक करणारा एक लग्झरी कार डीलर, भारतातील बहुराष्ट्रीय कंपनी, आयपीएलच्या टीमचा प्रायोजक, हवाला डीलर आणि भारतातील अंडरवर्लड डॉन दाऊद इब्राहिमला पैसे पुरवणाऱ्या एका फायनान्सरसह इतर लोक आणि अनेक कंपन्यांची नावे यामध्ये आहेत. 

 44 भारतीय बँकांकडून व्यवहार-
फिनसेन फायलींमध्ये 44 भारतीय बँकांची नावे आहेत. जे भारतातील परदेशी बँकांचे प्रतिनिधी आहेत. यामध्ये पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदाचा समावेश आहे.

फिनसेन फाइल्सला मिळालेल्या कागदपत्रांमध्ये 1999 ते 2017 या कालावधीत भारताशी संबंधित अनेक घटनांचा उल्लेख आहे. यातील माहितीनुसार 3 हजार 201 व्यवहार हे पैसे पाठवणारे, बँका आणि पैसे ज्यांना मिळाले त्यांचे पत्ते भारतातील आहेत. त्यांनी एकूण 112 अब्ज रुपयांचा व्यवहार केला आहे. याशिवाय असे हजारो व्यवहार आहेत जे परदेशात झाले आहेत.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disclosure fincen files clears how banks help scamsters hide treasure