चंद्रावर सोडिअमचे साठे; ‘चांद्रयान-२’च्या क्लास स्पेक्ट्रोमिटरचे निरीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

moon

चंद्रावर सोडिअमचे साठे; ‘चांद्रयान-२’च्या क्लास स्पेक्ट्रोमिटरचे निरीक्षण

बंगळूर : चंद्रावरील पाण्याचा शोध घेत ‘चांद्रयान-१’ मोहिमेने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. आता ‘चांद्रयान-२’ नेही चंद्रावरील सोडिअमच्या साठ्यांचा शोध घेत पुन्हा एकदा देशाची मान उंचावली आहे. ‘इस्रो’च्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील बग्गी जरी चंद्रावर उतरू शकली नाही तरी चंद्राभोवती फिरणाऱ्या उपग्रहाने (ऑर्बिटर) जगाला अवाक करणारे संशोधने पुढे आणली आहेत. उपग्रहावर स्थित ‘क्लास’ या क्ष-किरण स्पेक्ट्रोमीटरच्या साहाय्याने चंद्रावरील सोडिअमच्या साठ्यांची पुष्टी झाली.

‘चांद्रयान-१’ मोहिमेमधील क्ष-किरण फ्लुरोसन्ट स्पेक्ट्रोमिटरनेच चंद्रावर सोडिअम असल्याचे संकेत दिले होते. आता मात्र खाणी शोधण्यात यश आले आहे, अशी माहिती ‘इस्रो’ने दिली आहे. या संबंधीचे संशोधन ‘द ॲस्ट्रोफिजीकल जर्नल लेटर्स’ या शोधपत्रिकेत हे संशोधन प्रकाशित करण्यात आले. बंगळूर येथील ‘इस्रो’च्या यू.आर.राव सॅटलाईट सेंटरमध्ये ‘क्लास’ नावाचे स्पेक्‍ट्रोमिटर विकसित केले होते. प्रचंड कार्यक्षम असलेल्या या संयंत्राने सोडिअमच्या उपलब्धतेची स्पष्ट पुष्टी केल्याचे ‘इस्रो’ने म्हटले आहे.

असे आहे सोडिअम

  • चंद्राच्या पृष्ठभागाशी अगदी अलगदपणे सोडिअमचे अणु बांधले गेले आहे

  • सोडिअमचे अणू सौर वारा किंवा अतिनील किरणोत्‍सवाने चंद्राच्या पृष्ठभागातून सहज बाहेर काढले जाऊ शकतात

  • चंद्राच्या बाह्यभागाला (एक्झोस्पिअर) सातत्याने सोडिअमच्या अणूंचा पुरवठा होत आहे

  • चंद्राच्या एवढ्या अस्थिर वातावरणात सोडिअमच्या अणूंचे वास्तव्य निश्चितच कुतूहल निर्माण करणारे आहे

अभ्यासासाठी एक नवा आयाम खुला

‘चांद्रयान-२’ द्वारे प्राप्त झालेले नवे निष्कर्ष चंद्राचा पृष्ठभाग आणि बाह्यमंडळाच्या परस्परसंवादाच्या अभ्यासाठी एक नवीन आयाम खुला करत आहे. त्यामुळे बुध ग्रहासारख्या इतर अंतरग्रहांच्या अध्ययनाचा एक नवा अध्याय सुरू होईल, असे इस्रोने म्हटले आहे.