भाजपची मतपेढी फोडण्याचे आप-काँग्रेसपुढे आव्हान
भाजपची मतपेढी फोडण्याचे आप-काँग्रेसपुढे आव्हानSakal

भाजपची मतपेढी फोडण्याचे आप-काँग्रेसपुढे आव्हान

दिल्लीत ज्या पक्षाचे खासदार असतात, त्याच पक्षाचे केंद्रात सरकार येथे, असा अनुभव गेल्या २० वर्षांपासून आहे. २००४ व २००९ मध्ये काँग्रेसचे सातही खासदार दिल्लीतून निवडून आले होते.

नवी दिल्ली : भाजपने गेल्या काही वर्षांपासून दिल्लीवर प्रस्थापित केलेले वर्चस्व मोडून काढण्यासाठी आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली असली तरी भाजपची मतपेढी फोडण्याचे आव्हान या दोन्ही पक्षांपुढे आहे. काँग्रेसमध्ये उफाळलेला असंतोष आणि निराश कार्यकर्त्यांमुळे काँग्रेसच्या उमेदवारांनाही ‘आप’च्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

दिल्लीत ज्या पक्षाचे खासदार असतात, त्याच पक्षाचे केंद्रात सरकार येथे, असा अनुभव गेल्या २० वर्षांपासून आहे. २००४ व २००९ मध्ये काँग्रेसचे सातही खासदार दिल्लीतून निवडून आले होते. त्याच पक्षाचे केंद्रातही सरकार होते.

२०१४ व २०१९ मध्ये दिल्लीतून भाजपचे सातही खासदार निवडून आले आहेत. २०१९ मध्ये भाजपने ‘आप’ व काँग्रेस पक्षाला चांगलीच धोबीपछाड दिली होती. उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातील आपचे कार्यकर्ते शिवराज शर्मा यांनी ही बाब मान्य केली. ‘‘भाजपची मतांची टक्केवारी अधिक असली तरी २०१९ व यावेळच्या निवडणुकीत फरक आहे.

काँग्रेस व आपचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. यामुळे हा टक्का भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे,’’ असा दावा त्यांनी केला. उत्तर-पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम बहुल भागात अधिक प्रचार करण्यावर काँग्रेसचे उमेदवार कन्हैयाकुमार भर देत असल्याचे दिसून आले. सीलमपूर, मौजपूर, ब्रम्हपुरी, जगजीतनगर, घोंडा, बाबरपूर हा सर्व भाग मुस्लिम बहुल आहे. या भागात प्रचार करण्यावर काँग्रेस उमदेवारांचा भर आहे.

मताधिक्याचे आव्हान

चांदणी चौक या मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन २३.७१ टक्के मताधिक्याने निवडून आले होते. यावेळी भाजपने येथे प्रवीण खंडेलवाल यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने येथून ज्येष्ठ नेते जे. पी. अग्रवाल यांना पुन्हा उमेदवारी दिली.

पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात तर गेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्य सर्वाधिक म्हणजे ४०.१३ टक्के एवढे होते. त्याखालोखाल उत्तर-पश्चिम मतदारसंघात ३९.४८ टक्के मताधिक्याने भाजपचे उमेदवार व गायक हंसराज हंस निवडून आले होते. एवढे मताधिक्य भरून काढण्याचे आव्हान ‘आप’च्या चार आणि काँग्रेसच्या तीन उमेदवारांपुढे आहे.

काँग्रेसमध्ये असंतोष

दिल्ली काँग्रेसमध्ये असंतोषाचे पीक आल्याने दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना त्याचा फटका बसत आहे. अनेक नेते पक्ष सोडून गेलेले आहे तर अनेकजण नाराज होऊ घरी बसलेले आहेत. निवडणूक प्रचार सुरू झाल्यापासून काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याने दिल्लीत जाहीरसभा घेतलेली नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच सध्या या दोन्ही पक्षांचे स्टार प्रचारक आहेत.

नव्या चेहऱ्यांना संधी

राजधानी दिल्लीत भाजपच्या खासदारांबद्दल असलेला असंतोष संपविण्यासाठी भाजपकडून दिल्लीतील सातपैकी सहा उमेदवार बदलण्यात आले आहेत. त्यामुळे गौतम गंभीर, हंसराज हंस, प्रवेश वर्मा, रमेश बिधुडी यांच्या विरोधात असलेल्या असंतोषामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. आता नव्या चेहऱ्यांना घेऊन भाजप मतदारांपुढे जात आहेत. ही खेळीही भाजपच्या पथ्यावर पडलेली आहे असे मानले जात आहे. प्रचार संपायला केवळ आठ दिवस उरलेले असताना राजधानी दिल्लीत भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्याचे चित्र आहे.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीचा निकाल (सर्व आकडेवारी टक्क्यांमध्ये)

भाजप - ५६.८६

काँग्रेस - २२.५१

आप - १८.११

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com