कंडोमचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरवर कारवाई

वृत्तसंस्था
Tuesday, 3 September 2019

एक महिला पोट दुखत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर कंडोम वापरण्याचा सल्ला दिला होता.

रांचीः एक महिला पोट दुखत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये कंडोम वापरण्याचा सल्ला दिला. संबंधित विषयावरून झारखंड विधानसभेत गोंधळ उडाला. संबंधित डॉक्टरची चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे.

बहरागोडा येथील झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) आमदार कुणाल सारंगी यांनी याप्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. घाटशीला उपविभाग रुग्णालयामध्ये एक महिला पोटदुखीची तक्रार घेऊन उपचारासाठी गेली होती. डॉक्‍टरांनी तिला तपासल्यानंतर महिलेल्या लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये कंडोम वापरण्याचा सल्ला दिला होता. या प्रकरणाची तक्रार सारंगी यांनी थेट मुख्यमंत्री रघुवर दास आणि राज्याचे आरोग्य मंत्री रामचंद्र चंद्रवंशी यांच्याकडे केली होती. शिवाय, डॉक्टर अशरफ बदर यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची मागणी सारंगी यांनी केली होती. पीडित महिला ही घाटशीला उपविभाग रुग्णालयामध्येच चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत आहे. चौकशीनंतर डॉक्टर अशरफ बदर यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे.

पीडित महिला म्हणाली, 'मला अनेक दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे मी 23 जुलै रोजी डॉक्‍टर अशरफ यांच्याकडे तपासणीसाठी गेले होते. पोटात गॅस झाल्याने पोट दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर डॉक्‍टरांनी मला औषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रीप्शन) लिहून दिली. जेव्हा मी ती चिठ्ठी घेऊन औषधे आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेले तेव्हा डॉक्टर अशरफ बदर यांनी त्या चिठ्ठीमध्ये कंडोम असे लिहिल्याचे मेडिकलवाल्याने मला सांगितले.' यानंतर महिलेने रुग्णालय व्यवस्थापनाकडे डॉक्‍टर अशरफ बदर यांच्याविरुद्ध तक्रार केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी राग व्यक्त केला होता. शिवाय, विधानसभामध्ये हा मुद्दा उपस्थित झाला आहे.

डॉक्‍टर अशरफ म्हणाले होते की, 'संबंधित माहिला माझ्याकडे तपासणीसाठी कधी आली होती, याबद्दल आठवत नाही. शिवाय, या महिलेऐवजी तिचा मुलगा किंवा सून माझ्याकडे तपासणीसाठी आले असतील आणि त्यांना मी प्रिस्किप्शनवर कंडोम लिहून दिले असेल, अशी शक्‍यता आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor ashraf badar dismissed for recommending condom for stomach complaint in ghatshila