
कोरोना महामारीने अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण केली आहे.
नवी दिल्ली- कोरोना महामारीने अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण केली आहे. हजारो नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. आरोग्य कर्मचारी दिवसरात्र रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर एका डॉक्टराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हॉस्पिटलमधील कोविड-19 रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी, यासाठी आसाममधील एका डॉक्टरने भन्नाट डान्स केला आहे. सोशल मीडियावर या डॉक्टरचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
#WATCH: A doctor at Silchar Medical College dances to the tune of a Bollywood number in a COVID ward. #Assam pic.twitter.com/DxTsR1m8ph
— ANI (@ANI) October 19, 2020
डॉ, सयद फैजान एहमद यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून यात डॉ. अरुप सेनापती डान्स करत आहेत. वॉर चित्रपटातील घुंगरु या गाण्यावर सेनापती डान्स करत आहेत. आसामच्या सिल्चर मेडिकल कॉलेजमध्ये सर्जन असणारे सेनापती यांनी पीपीईकीटमध्ये उत्तम मुव्हज करुन दाखवले आहेत. विशेष म्हणजे अभिनेता हृतिक रोशन यानेही या व्हिडिओची दखल घेतली आहे. हृतिकने या डॉक्टरच्या स्पिरिट आणि डान्सला सलाम केला आहे. हृतिकने डॉक्टर सेनापतीकडून डान्स शिकण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.
Tell Dr Arup I’m gonna learn his steps and dance as good as him someday in Assam . Terrific spirit . https://t.co/AdBCarfCYO
— Hrithik Roshan (@iHrithik) October 19, 2020
सीलचर मेडिकल कॉलेजमध्ये काही रुग्णांच्या उपस्थितीत हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. डॉ. सेनापती यांनी यावर प्रतिक्रिया दिली. गेल्या सात दिवसांपासून सलग आम्ही कोविड रुग्णांची सेवा करत होता. त्यांनतर आम्हाला काही दिवस सक्तीचे विलगीकरण व्हावे लागणार होते. शेवटच्या दिवशी सहकार्यांनी मला डान्स करण्याचा आग्रह केला होता, असं ते म्हणाले आहेत.
पीपीईकीटमध्ये काम करणं अवघड होतं. सात दिवस आम्ही काम करत होतो. रुग्णांना थोडासा मोकळेपणा वाटावा आणि त्यांना नैतिक आधार मिळावा यासाठी मी डान्स केला. माझ्या डान्सने रुग्ण खूप आनंदी झाले होते, असं सेनापती यांनी सांगितलं. सेनापती आपल्या कॉलेज जीवनापासून चांगले डान्सर आहेत. दरम्यान, डॉ. सेनापती यांच्या डान्स व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरुन कमेंटचा पाऊस पडत आहे.