धक्कादायक! मुलीनेच आई आणि भावावर केला गोळीबार; दोघांचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलाच्या खूनाने खळबळ उडाली होती.

लखनऊ - उत्तर प्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलाच्या खूनाने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी मोठा खुलासा झाला असून पोलिस आयुक्त सुजीत पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे अधिकारी आरडी वाजपेयी यांच्या मुलीनेच आई आणि भावावर गोळीबार केली. यात दोघांचाही मृत्यू झाला. तिने झोपताना दोघांना पाइंट 22 च्या रायफलने गोळी मारली होती. 

वरिष्ठ IRTS अधिकारी आरडी वाजपेयी यांची मुलगी राष्ट्रीय पातळीवरची नेमबाज आहे. सुरुवातीला आई आणि भावाच्या हत्येमुळे तिला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात होतं. तिनंच 112 नंबरवर फोन करून पोलिसांना बोलावलं होतं. पोलिस आयुक्त सुजित पांडेय यांनी सांगितलं की, आरोपी मुलीने रायफलमधून 5 गोळ्या चालवल्या होत्या. पोलिसांनी रायफल ताब्यात घेतली आहे. 

पांडेय म्हणाले की, मुलीने स्वत:च याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ब्लेडने हाताची शिर कापून आत्महत्या करण्याचा प्रकार तिने याआधी केल्याची माहिती मिळाली आहे. तसंच आताही हाताला पट्टी बांधलेली होती. तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. 

घटनेनंतर अशीही चर्चा सुरु होती की घरात दरोडा पडला आहे. मात्र पोलिसांनी दरोड्याचा प्रकार नसल्यासं स्पष्ट केलं होतं. आरडी वाजपेयी यांची मुलगी नॅशनल शूटर आहे. घटनेनंतर तिने पोलिसांना माहिती दिली आणि नंतर आजीला बोलावलं होतं. पोलिस आता या प्रकऱणाची अधिक चौकशी कर आहेत. आरडी वाजपेयी दिल्लीत असून ते लखनऊला येण्यासाठी निघाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up double murder near cm house mother and son shot dead