डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडल्यानंतर कम्युनिझम नाकारला; प्रदिप रावत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडल्यानंतर कम्युनिझम नाकारला; प्रदिप रावत

पुणे: डावे हे खोटारडे असून टोकाची असहिष्णुता आणि कंपूशाही करणारी जमात आहे. ते सगळे सारखे आहेत, अशी आकर्षक वाक्ये वापरून सामान्य लोकांना फसवायचे आणि प्रत्यक्षात स्वतःचे हित साधून घ्यायचे. त्यांच्या या कृतीतून ते ढोंगीपणा करणारे स्पष्टपणे दिसते आहे. विश्‍वासघात हाच डाव्यांचा खरा उद्योग असल्याचे मत राज्याचे सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दिक्षीत यांनी शनिवारी (ता.२७) पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

शेतकरी, कामगार, दलित, अल्पसंख्य समाज, गरिबांच्या नावाने त्यांच्या खऱ्या-खोट्या मागण्यांचे आपणच प्रवक्ते आहोत, असा कांगावा करत, खरा चेहरा लपवायचा आणि हिंसाचार करायचा ही डाव्यांची प्रवृत्ती असल्याचा आरोपही दिक्षीत यांनी यावेळी केला. भाजप नेते माधव भांडारी लिखित "डाव्यांचा खरा चेहरा" या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार आणि विवेक विचार मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत आणि लेखक माधव भांडारी आदी उपस्थित होते.

दिक्षीत म्हणाले, ‘‘डाव्यांच्या भ्रष्टाचाराचे वास्तव, विरोधाचे केवळ ढोंग, बौद्धिक क्षेत्रातही भ्रष्टाचार यावर माधव भांडारी यांनी या पुस्तकात स्पष्ट उल्लेख केला आहे. चीन, रशिया या देशात हिंसक क्रांती घडवून सत्ता काबीज करणाऱ्या डाव्यांनी या वर्गाचे काय कल्याण केले हे समाजाने पाहिलेच आहे. सत्ता काबीज करून भ्रष्टाचार करणे हाच डाव्यांचा खरा चेहरा आहे.

हा चेहरा लोकशाही व्यवस्थेपुढे कोणता धोका उभा करतो, हे नक्षलवादी चळवळीतून देशाने अनुभवले आहे. वनात वास्तव्यास असलेल्या समाजाच्या उद्धाराची भाषा करत नक्षलवाद्यांनी आपले अर्थकारण चालविले आहे. डाव्यांचा हा खरा चेहरा समजून घेण्यासाठी भांडारी यांचे हे पुस्तक उपयुक्त आहे.’’

भारतातच राहून भारताच्या सरकारविरुद्ध डाव्यांनी पुकारलेले हे युद्ध आहे. शेवटचा मनुष्य शस्त्र खाली ठेवेपर्यंत मोहिमा आखून लष्कराच्या मदतीने हा बीमोड करणे आवश्यक आहे. डावी विचारसरणी हा देशाच्या पोटात झालेला कर्करोग असून देशाच्या सार्वभौमत्वापुढील मोठे आव्हान आहे. प्राधान्य क्रमाने या कर्करोगाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे.

धोरणात्मक पातळीवर सरकारला अडचणीत आणून प्रगतीच्या मार्गात अडथळे आणायचे, ही त्यांची मानसिकता आहे. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडल्यानंतर कम्युनिझम नाकारला होता. स्वातंत्र्याचा बळी देऊन मिळणारी समता आंबेडकरांनी नाकारली होती, असे मत प्रदिप रावत यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले. या पुस्तकाचे लेखक माधव भांडारी यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली.

टॅग्स :FarmerworkerOBC