
औषधांच्या किमती निश्चित
नवी दिल्ली : राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) मंगळवारी विविध आजारांवरील पंधरा औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या असून त्यामध्ये मधुमेहावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मार्चमधील शेवटच्या आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. आता या कंपन्यांना आम्ही निश्चित केलेले दर पाळावे लागतील असे ‘एनपीपीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘असोसिएटेड बायोटेक, डेल्स लॅबरोटरीज’ यांनी उत्पादित केलेल्या मेटाफॉर्मिन आणि टेनेलिग्लिप्टीनच्या प्रत्येकी एक गोळीची किंमत ७.१४ रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. दापाग्लिफ्लोझीन + मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराईडच्या प्रत्येकी एका गोळीची किंमत ही १०.७ रुपये एवढी निश्चित करण्यात आली असून या गोळ्यांचा मधुमेही रुग्णांकडून वापर केला जातो.
शिरेवाटे घेतल्या जाणाऱ्या १० मिलिलीटरच्या ह्युमन नॉर्मल इम्युनोग्लोबुलिनचा डोसची किंमत आता १७७.८५ रुपये एवढी निश्चित करण्यात आला आहे. औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी इंटिग्रेटेड फार्मास्युटिकल्स डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिमच्या (आयपीडीएमएस) माध्यमातून किमतींची यादी जारी करावी आणि त्याची एक प्रत ही राज्याचे औषध नियंत्रक आणि डिलर्संना पाठवावी असेही ‘एनपीपीए’ने म्हटले आहे. ‘औषध नियंत्रक कायदा-२०१३’ नुसार प्रत्येक रिटेलर आणि डिलरने उत्पादकाने तयार केलेली किमतीची यादी दर्शनी भागामध्ये लावणे आवश्यक आहे त्यामुळे ग्राहकांना ती सहज पाहता येईल आणि त्याबाबत विक्रेत्यांशी चर्चा करता येईल.
Web Title: Drug Prices Fixed National Pharmaceutical Pricing Authority Fixed Retail Prices Fifteen Drugs Various Ailments
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..