कोरोनाच्या संकटामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन मुदतीपूर्वीच संपणार!

टीम ई-सकाळ
Saturday, 19 September 2020

सरकार आणि विरोधी पक्षात झालेल्या चर्चेनंतर पावसाळी अधिवेशन लवकर संपविण्याबाबत सहमती झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी 14 तारखेपासून सुरु झाले होते. हे अधिवेशन शनिवार आणि रविवारसह सलग 18 दिवस चालणार होते. मात्र पुढील आठवड्यात बुधवारी लोकसभेचे अधिवेशन गुंडाळण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबरपूर्वीच संसदेचे पावसाळी अधिवेशन संपविण्याचा विचार केला जात आहे. सरकार आणि विरोधी पक्षात झालेल्या चर्चेनंतर पावसाळी अधिवेशन लवकर संपविण्याबाबत सहमती झाली असल्याची माहिती मिळाली आहे. अधिवेशन चालू झाल्यानंतर दोन मंत्री आणि भाजपचे एक खासदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मान्सूनचे अधिवेशन ठरलेल्या वेळेपूर्वी संपेल असा विचार केला जात आहे. 

श्रमिक गाड्यांत किती लोकांचा मृत्यू झाला? रेल्वेमंत्र्यांनी दिली राज्यसभेत...

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी 14 तारखेला सुरु झाल्यानंतर भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज्यसभेत भाषण केले होते. आणि त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल सकारत्मक आढळला होता. मात्र अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केलेल्या तपासणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी आणि प्रह्लाद पटेलही यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. नितीन गडकरी यांनी 16 तारखेला आपल्याला कोरोना विषाणूची  लागण झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या ट्विटरवरून दिली होती. या ट्विट मध्ये त्यांनी अशक्तपणा जाणवत होता आणि त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी केल्यानंतर तिचा अहवाल सकारत्मक आला असल्याचे म्हटले होते. तर याआधी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांना कोरोनाचा फटका बसला आहे.  

यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचे काही दिवस कमी करण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने आज संध्याकाळी व्यापार सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांशी सल्लामसलत केल्यानंतर निर्णय घेतला. अनेक विरोधी पक्ष देखील अधिवेशन लवकर संपविण्याच्या बाजूने होते. तर यापूर्वी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये लोकसभेचे सतरा आणि राज्यसभेचे आठ सदस्य कोरोनाबाधित झाल्याचे निदर्शनास आले होते. ज्यामध्ये संक्रमित खासदारांमध्ये भाजपाची संख्या सर्वाधिक होती. सत्ताधारी भाजपमधील 12 खासदार, वायएसआर कॉंग्रेसचे दोन तर, शिवसेना, द्रमुक आणि आरएलपी यांच्या प्रत्येकी एक खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.  

दिलासादायक बातमी; 'कोरोना रिकव्हरी रेट' भारतात सर्वाधिक

कोरोनाच्या सावटाखाली यंदाच्या संसदेचे पावसाळी अधिवेशन होत असल्यामुळे खासदारांमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संसदेत मोठी उपाययोजना करण्यात आली होती. परंतु सरकारला कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळे अधिवेशन मुदतीपूर्वीच संपवण्याचा विचार करत असल्याचे समजते. तर आत्तापर्यंत झालेल्या कामकाजात लोकसभेने कृषी क्षेत्राशी जोडलेली केवळ तीन बिले मंजूर केली आहेत. याशिवाय कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी संसद सदस्यांच्या पगाराच्या 30 टक्के कपात करण्याचा अध्यादेश दोन्ही सभागृहाने मंजूर केला आहे. यावितिरिक्त अधिवेशनात एकूण 45 विधेयके मांडली जाणार असून त्यांपैकी 23 नवी विधेयके सरकार मांडणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Corona crisis monsoon session of Parliament will end before of time