पवारांसह ७१ नेते ‘ईडी’च्या रडारवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 25 September 2019

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कर्जवाटपातील गैरव्यवहाराचे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले असून, ‘मनी लाँडरिंग’ प्रतिबंधक कायद्याखाली त्याची नोंद केली आहे.

राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरण
नवी दिल्ली - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कर्जवाटपातील गैरव्यवहाराचे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले असून, ‘मनी लाँडरिंग’ प्रतिबंधक कायद्याखाली त्याची नोंद केली आहे. याप्रकरणी मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्यात अजित पवार, आनंदराव अडसूळ आदी ७० नेत्यांचा समावेश आहे. ‘ईडी’कडील अनुषंगिक कागदपत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव असून, हे सर्व नेते ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत.

दरम्यान, या बॅंकेचा मी सभासदही नाही, असे स्पष्टीकरण देतानाच पवार यांनी आपल्या सभांना मिळत असलेल्या प्रतिसादाचा हा परिणाम असल्याचा टोला लगावला. 

‘ईडी’च्या अधिकृत प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत याप्रकरणी अजित पवार, दिलीप देशमुख, ईश्‍वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील यांच्यासह ७० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. हेच प्रकरण ‘ईडी’ने ताब्यात घेतले आहे. ‘ईडी’च्या अधिकृत सूत्रांनुसार, यातील संशयित आरोपींच्या यादीत शरद  पवार यांचे नाव नाही. मात्र, अनुषंगिक दस्तावेजांमध्ये त्यांचे नाव आहे. 

पवार ‘ईडी’च्या रडारवर आल्याच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात ऐन निवडणुकीच्या काळात खळबळ उडाली आहे. 

तांत्रिकदृष्ट्या हे प्रकरण ताब्यात घेताना ‘ईडी’तर्फे संबंधित एफआयआरचाच आधार घेतला जातो. त्यामुळे आज हे प्रकरण ताब्यात घेऊन ‘मनी लाँडरिंग’प्रतिबंधक कायद्याखाली नोंद करताना मुंबई पोलिसांचा एफआयआर व त्याबाबतची पुष्टी करणारी कागदपत्रेच आधारभूत धरण्यात आली आहेत. या कागदपत्रांनुसार सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा हा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा उल्लेख आहे. कारखाने व सूतगिरण्यांना कर्जे देताना कोणतेही तारण घेण्यात आले नव्हते, असा संदर्भही यात देण्यात आला. यामध्ये संगनमताने बॅंकेच्या निधीचा गैरव्यवहार आणि बॅंकेला अपरिमित आर्थिक नुकसान करण्यात आल्याचेही या टिपणात म्हटलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED Files against NCP Sharad Pawar State Maharashtra Bank Scam