निवडणूक प्रचारात ‘पुलवामा’ गाजणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 2 November 2020

पाकिस्तानच्या संसदेतच पुलवामा हल्ल्याबाबत कबुलीजबाब आल्यानंतर भाजपने वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकीत हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने मांडून विरोधकांवर हल्ला करण्याची रणनीती आखली आहे.

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याबद्दल पाकिस्तानच्या संसदेत झालेल्या खुलाशानंतर भाजपच्या हाती एक ठोस निवडणूक मुद्दा मिळाला असून सध्या सुरु असलेल्या बिहार, आगामी बंगाल आणि इतर राज्यांच्या निवडणुकीतही हा मुद्दा हुकमी एक्क्यासारखा वापरण्याची रणनीती पक्षनेतृत्वाने आखली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात खिशात वादाचा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा भाजप वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यावर जोर देणार आहे. जेथे निवडणुका-पोटनिवडणुका आहेत तेथे तर हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला आहेच, पण जेथे निवडणुका नाहीत तेथेही भाजप पाकिस्तान, पुलवामा, सर्जिकल स्ट्राइक या सर्व अनुषंगाने विरोधकांनी लष्करावर घेतलेल्या शंका आणि सरकारवर केलेले आरोप याचा मुद्दा मांडणार आहे. पुलवामा हल्ला, त्यानंतर एअर स्ट्राइक आणि सर्जिकल स्ट्राइकवर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या प्रकाराने शंका-कुशंका घेतल्या होत्या. पुलवामा हल्ल्याचा राजकीय फायदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळाला, यासारखी वक्तव्यही करण्यात आली होती. आता पाकिस्तानच्या संसदेतच पुलवामा हल्ल्याबाबत कबुलीजबाब आल्यानंतर भाजपने वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकीत हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने मांडून विरोधकांवर हल्ला करण्याची रणनीती आखली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मिशन बंगाल
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही भाजप दहशतवादाचा मुद्दा जोरदारपणे मांडणार आहे. पश्चिम बंगाल निवडणूक हे खुद्द गृहमंत्री अमित शाह यांचे मिशन मानले जाते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या सरकारचे लांगुलचालन असे धोरण त्या अनुषंगाने भाजप संपूर्ण प्रचाराचा पाया भक्कम करण्याच्या तयारीत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिहारला जाऊ न शकलेले शहा या आठवड्यात बंगालमध्ये जात आहेत. तेथे भाजपसरकार आणण्यासाठी पूर्ण अनुकूल स्थिती असल्याचे फीडबॅक पक्षनेतृत्वाला मिळाले आहेत.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the election campaign political advantage of Pulwama attack