
विजयी रॅलीवर बंदी; न्यायालयानं फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाला आली जाग
EC Bans Victory Procession : मद्रास हाय कोर्टानं फटकारल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दोन मे रोजी होणाऱ्या मतमोजणीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आसाम, केरळ, तामिलनाडू, पश्चिम बंगाल या चार राज्यासह पुदुचेरी या केंद्र शासित प्रदेशातील निवडणूक प्रचार थंडावला असून मतदारांचं भवितव्या मतदान पेटीत कैद झालं आहे. दोन मे रोजी चार राज्य आणि एक केंद्र शासित प्रदेशातील मतमोजणी होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विजयी रॅलीवर बंदी घालण्यात आली आहे.
सोमवारी मद्रास हाय कोर्टानं भारतीय निवडणूक आयोगाला फटकारलं होतं. भारतातील दुसऱ्या कोरोना लाटेला जबाबदारी धरत निवडणूक आधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवं, असं संतप्त मत व्यक्त केलं होतं. त्याशिवाय, 30 एप्रिलपर्यंत दोन मे रोजी होणाऱ्या निकालासाठीची नियमावली तयार करण्याचा आदेशही दिला होता. त्यानुसार, निवडणूक आयोगानं विजयी झाल्यानंतर रॅली काढण्यावर बंदी घातली आहे. तसेच विजयी उमेदाराजवळ गर्दी करण्यासही मनाई केली आहे. विजयी उमेदरासोबत फक्त दोन जणांना उपस्थित राहण्याची सवलत निवडणूक आयोगानं दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर आता कोणताही पक्ष विजयी रॅली काढू शकत नाहीत. देशातील वाढत्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पाहून निवडणूक आयोगानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मद्रास हाय कोर्ट काय म्हणालं होतं?
आज अवघा देश कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या तीव्र लाटेला सामोरे जात असून त्यासाठी केवळ निवडणूक आयोगच जबाबदार आहे. तुमच्यावरच खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे खडे बोल आज मद्रास उच्च न्यायालयाने आयोगाला सुनावले. देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असतानाही तुम्ही पाच राज्यांमधील निवडणूक प्रचाराला परवानगी दिली. आता दोन मे रोजी जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा कोरोनाविषक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जायला हवे. त्या नियमांची ब्लूप्रिंट आम्हाला सादर करा अन्यथा आम्ही मतमोजणी थांबवू असा निर्वाणीचा इशारा देखील न्यायालयाने दिला.
Web Title: Election Commission Of India Bans All Victory Processions On Or After The Day Of Counting Of Votes On May 2nd Detailed Order
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..