इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मराठी शाळांकडे

मिलिंद देसाई
रविवार, 19 मे 2019

एक नजर

  • इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे.
  • बालिका आदर्श, मराठी विद्यानिकेतन, शानभाग शाळेत अशा विद्यार्थ्यांची संख्या अधिक .
  • यावर्षी बालिका आदर्श शाळेत आतापर्यंत इंग्रजी माध्यमाच्या ८ विद्यार्थ्यांचा प्रवेश. 

बेळगाव - इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे वळू लागले आहेत. गेल्या काही वर्षात एक ते दोन वर्षे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. बालिका आदर्श, मराठी विद्यानिकेतन, शानभाग शाळेत अशा विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यावर्षी बालिका आदर्श शाळेत आतापर्यंत इंग्रजी माध्यमाच्या ८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तसेच इतर शाळांमध्येही इंग्रजी माध्यमाचे शिक्षण अर्धवट सोडून अनेक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.

गेल्या काही वर्षात शहरातील इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे मराठीसह कन्नड व उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. मात्र, इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती किती झाली, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच रहात आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कठीण जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच काही विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शिक्षण अर्धवट सोडून मराठी माध्यमाला प्राधान्य देत आहेत. 

प्राथमिक मराठी शाळांबरोबरच माध्यमिक मराठी शाळांमध्येही इंग्रजीचे शिक्षण अर्धवट सोडून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या समजून येतो. याचा पालकांनी विचार करावा.
-आर. आर. कुडतूरकर,
मुख्याध्यापक, ठळकवाडी हायस्कूल

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर यावर्षी आतापर्यंत ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध वर्गात प्रवेश घेतला आहे.

अनेक पालकांनाही आता मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व पटले आहे. त्यामुळेच शहरातील खासगी माध्यमाच्या मराठी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी गर्दी करु लागले आहेत. त्यामुळेच काही शाळांमध्ये डोनेशन भरुन विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागत आहे. दरम्यान, काही शाळांमधील एलकेजी, युकेजी व पहिलीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: English Medium students leave school and take admission in Marathi school