चाचण्यांचा कौल काँग्रेसला

वृत्तसंस्था
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नवी दिल्ली - लोकसभेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला झटका बसण्याचा अंदाज शुक्रवारी मतदानोत्तर चाचण्यांमधून नोंदविण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - लोकसभेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला झटका बसण्याचा अंदाज शुक्रवारी मतदानोत्तर चाचण्यांमधून नोंदविण्यात आला आहे. 

हिंदी भाषक पट्ट्यातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात भाजपचा पुन्हा सत्तेवर येण्याचा मार्ग खडतर असल्याचे या चाचण्या सांगतात. ईशान्येतील मिझोरामची सत्ता काँग्रेस गमावेल, तर तेलंगणमध्ये सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समिती पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. आज राजस्थानात ७४, तर तेलंगणमध्ये ६७ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम विधानसभांच्या निवडणुकांसाठी मतदानानंतर झालेल्या चाचणीचे हे निष्कर्ष आहेत.  मध्य प्रदेशात गेली १५ वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपला यंदा काँग्रेसबरोबर काट्याची लढत द्यावी लागेल. एवढेच नव्हे, तर भाजपला येथे बहुमत मिळणार नाही, असा अंदाज आहे. छत्तीसगडमध्येही भाजपला विरोधी काँग्रेसबरोबर झुंजावे लागणार आहे. या राज्यातही भाजपला जागा जास्त मिळतील; पण बहुमतापासून हा पक्ष दूर राहील, असा अंदाज आहे. एकाच पक्षाला दुसऱ्यांदा निवडून न देण्याची परंपरा असलेल्या राजस्थानात यंदाही तसेच चित्र असेल आणि तेथे काँग्रेस सत्तेवर येईल, असे या चाचण्या सांगतात. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी आठ महिने आधीच सभागृह बरखास्त करून निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या तेलंगणमध्ये मात्र ‘टीआरएस’ पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. काँग्रेससह अन्य विरोधकांना येथे फार यश मिळणार नाही, असे दिसते. मिझोराममध्ये सत्तारूढ काँग्रेसला सत्ता गमवावी लागण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Exit Polls 2018 Gives Strength To Congress