esakal | केंद्र सरकार मुलींच्या खात्यावर दर महिन्याला पाठवतंय 2500 रुपये? जाणून घ्या खरं काय
sakal

बोलून बातमी शोधा

money

एका व्हायरल व्हिडिओमध्ये केंद्र सरकार प्रत्येक मुलीच्या खात्यावर दर महिन्याला अडीच हजार रुपये पाठवत असल्याचा दावा केला जात आहे.

केंद्र सरकार मुलींच्या खात्यावर दर महिन्याला पाठवतंय 2500 रुपये? जाणून घ्या खरं काय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या काही योजनाबाबत अनेकदा खोटी माहिती पसरवली जाते. यातून फसवणुकीचे प्रकारही घडतात. एखाद्या योजनेबाबत खोटी माहिती किंवा व्हिडिओ व्हायरल केला जातो. त्यानंतर सर्वसामान्यांना अर्ज करण्यासाठी एखादी लिंक दिली जाते. त्यावरून संबंधितांची माहिती घेण्यात येते. यामध्ये बँक डिटेल्सचा समावेश असतो. माहिती घेतल्यानंतर लोकांच्या खात्यातून पैसे काढून आर्थिक फसवणूक केली जाते. आताही केंद्राच्या अशाच एका योजनेबाबत खोटी माहिती दिली जात आहे. याबाबत प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने लोकांना सावध केलं आहे.

पीआयबीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एका व्हायरल व्हिडिओमध्ये केंद्र सरकार प्रत्येक मुलीच्या खात्यावर दर महिन्याला अडीच हजार रुपये पाठवत असल्याचा दावा केला जात आहे. ही माहिती पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे. केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही.

एका युट्यूबवरील व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात येत आहे की, केंद्र सरकार मुलींच्या बँक खात्यामध्ये कन्या सन्मान योजनेंतर्गत दर महिन्याला अडीच हजार रुपये जमा करत आहे.

हे वाचा - कोरोनाचा धसका! संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द होण्याची शक्यता

पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचं आढळून आलं आहे. पीआयबीने लोकांना सल्ला दिला आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्याआधी योग्य ती माहिती घ्या. पडताळून पाहिल्यानंतरच त्यासाठी अर्ज वगैरे करा.

केंद्र सरकारकडून सुरु करण्यात येणाऱ्या योजनांची माहिती संबंधित मंत्रालयांकडून जाहीर केली जाते. प्रत्येक योजनेशी संदर्भात मंत्रालयाचे संकेतस्थळ, पीआयबी आणि अधिकारी यांच्याकडून माहिती दिली असेल तरच अर्ज करा. तसंच अशा प्रकारची कोणतीही खोटी माहिती पसरवली जात असेल तर पीआयबी फॅक्ट चेकला संपर्क करा.

loading image