मुलगाच पाहिजे... पण मुलगीही हवी, कौटुंबीक आरोग्य सर्वेक्षणात उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Family Health Survey mentality of people At least one boy birth rate of girls
मुलगाच पाहिजे....पण मुलगीही हवी!

मुलगाच पाहिजे... पण मुलगीही हवी, कौटुंबीक आरोग्य सर्वेक्षणात उघड

नवी दिल्ली : एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक उजाडले तरी भारतीय समाजात ‘एक तरी मुलगा हवाच’ ही धारणा घट्ट आहे. मात्र मुलाऐवजी मुलगी हवी अशी इच्छा बाळगणाऱ्यांच्या संख्येत किंचित का होईना वाढ झाली आहे. अनेक समाजसुधारकांचे शतकांचे परिश्रम आणि सरकारच्या प्रयत्नांना या बदलत्या व सकारात्मक मानसिकतेचे श्रेय जाते असे सरकारी यंत्रणेचे मत आहे. केंद्र सरकारच्या कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचे (एनएफएचएस) काम नुकतेच झाले. २०१९ ते २०२१ दरम्यान सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत सर्वेक्षणाच्या प्राथमिक टप्प्यातील काही निकष नीती आयोगाने मागील वर्षाअखेर जारी केले होते.

सुधारित निकष नुकतेच जारी करण्यात आले. त्यात अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेषतः देशात मुलींचे प्रमाण किंचित वाढले असून मुलाएवजी मुलगी हवी किंवा मुलगी झाली तरी चालेल, असे मानणाऱ्यांची संख्या मागील अहवालाच्या तुलनेत ५.९६ वरून ५.१७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तरीही सर्वेक्षणात सहभागी झालेल्या किमान ५० टक्के लोकांनी घराण्याचे नाव कायम ठेवण्यासाठी एक तरी मुलगा हवाच, ही पारंपरिक समजूत कायम ठेवलेली दिसते. या सर्वेक्षणात ७०७ जिल्ह्यांतील ६१ लाख कुटुंबांची मते आजमावण्यात आली.

१५ ते ६५ वयोगटातील सुमारे ६५ टक्के विवाहित महिलांनी, मुलगा पाहिजे असा दबाव कुटुंबाकडून येतो असे नमूद केले. मागील सर्वेक्षणात हे प्रमाण ६३ टक्के होते. त्यातही बहुतांश महिलांनी, दोन मुलींनंतर आता आपल्याला तिसऱ्या अपत्याला जन्म देण्याची इच्छाशक्ती नाही असे आगतिकतेने सांगितले. त्याच वेळी ताज्या अहवालात मुलगीच पाहिजे असे ठामपणे सांगणाऱ्या तरुण जोडप्यांची संख्या किंचित वाढली असून १४० कोटींच्या देशात हादेखील पारंपारिक समजुतींना धक्का देणारा व आशेचा किरण आहे, असे मत मंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केले.

याचा सरळ संबंध देशाच्या लिंग अनुत्पात दराबरोबर आहे. वाढते शहरीकरण, वाढती महिला साक्षरता व गर्भनिरोधकाचा वाढता वापर (५४ वरून ६७ टक्के) यामुळे देशाचा प्रजनन दर दोन टक्क्यांपर्यंत घटला आहे. कोणत्याही देशात प्रजननदराचा आकडा २.१ टक्क्यांच्या खाली जातो त्यानंतर सुमारे तीन दशकांनी लोकसंख्या वाढीचा आलेख स्थिरतेच्या पातळीपर्यंत येतो हे चीन व अनेक पाश्चिमात्य देशांच्या बाबतीत दिसले आहे.

मुलीएवजी मुलगाच का हवा, या प्रश्नावर महिलांनी दिलेली उत्तरेही भारतीय समाजाच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतात. घराण्याचे नाव मुलगाच वाढवतो, वृद्धापकाळात मुलगाच आईवडिलांना आधार देतो, मुलगी हे परक्याचे धन, मुलगा होणे हा देवाचा आशीर्वाद, मुलगी झाली तर हुंड्याचा खर्च करणे भाग आहे, अशा अनेक समजुती आजही मोठ्या लोकसंख्येच्या मनात घट्ट घर करून आहे.

मंजुरीचा निर्धार

मुलामुलींचे विवाहाचे वय समान म्हणजे २१ असावे याबाबतचे विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याचा सरकारचा निर्धार आहे. देशात १८ ते २९ या वयोगटातील २५ टक्के महिलांचा विवाह वयाच्या १८ वर्षांआधी झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.

Web Title: Family Health Survey Mentality Of People At Least One Boy Birth Rate Of Girls

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top