पक्षांतर्गत भावनेतून बाहेर पडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farewell ceremony of President Ram Nath Kovind by Parliament

पक्षांतर्गत भावनेतून बाहेर पडा

नवी दिल्ली - जेव्हा देशाला एका विशाल कुटुंबाच्या नजरेतून आपण पाहू तेव्हा मतभेद दूर करण्याचेही अनेक रस्ते लक्षात येतात. राजकीय पक्षांनी पक्षांतर्गत भावनेतून बाहेर पडून विरोध करण्यासाठी गांधीवादी रस्त्याने गेल्यास उत्तम होईल, असे आवाहन मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले. कोविंद यांना संसदेतर्फे एका छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या छोटेखानी निरोप समारंभाला उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व भाजप खासदार उपस्थित होते. कोविंद यांना दिलेल्या मानपत्राचे बिर्ला यांनी वाचन केले. एक यशस्वी वकील, खासदार, राज्यपाल व राष्ट्रपती म्हणून कोविंद यांनी अनेक अनुकरणीय पायंडे पाडले ते संसद सदस्यांच्या कायम आठवणीत राहातील असे मानपत्रात नमूद करण्यात आले आहे.

एका छत गळणाऱ्या घरात कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करणाऱ्या माझ्यासारख्या गरीब मुलांचे प्रमाण सध्या कमी होत असल्याची वस्तुस्थिती समाधानकारक असल्याचे सांगून कोविंद म्हणाले, की आम्ही सारेच संसदरूपी कुटुंबातील सदस्य आहोत. संसद हे लोकशाहीचे मंदिर असून राष्ट्रपती व संसद हे एकाच विकासयात्रेचे प्रवासी असतात. राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘स्वप्नातील भारत’ घडविण्यासाठी याच संसदेत कायदे केले जातात. कोविंद म्हणाले, की आपल्या कार्यकाळात महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सरकारने राबविलेली ‘स्वच्छ भारत मोहीम’ ही गांधीजींना दिलेली खरी श्रद्धांजली ठरली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात सहभागी होण्याचीही संधी आपल्याला मिळाली, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

कोरोनाने नवे धडे शिकविले

शतकातून एकदाच येणाऱ्या कोरोनासारख्या महासाथीने आपल्यालाही काही नवे धडे शिकविले असे सांगून राष्ट्रपती कोविंद म्हणाले, की आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत हे माणूस विसरत चालला होता पण या साथीने त्याला ती आठवण करून दिली. पर्यावरण असंतुलन हेही कोरोनाचे एक कारण असून तापमानवाढीचे फटके आम्हालाही बसत आहेत, असाही त्यांनी इशारा दिला. कोरोना काळात भारताने साथ निर्मूलनासाठी जे प्रयत्न केले त्याची जगभरात प्रशंसा झाली. भारताने १८ महिन्यांत २०० कोटी नागरिकांचे लसीकरण केले व ८० कोटी गरिबांना मोफत रेशन दिले अशा शब्दांत कोविंद यांनी सरकारच्या धोरणांची प्रशंसा केली.

Web Title: Farewell Ceremony Of President Ram Nath Kovind By Parliament

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top