नवी दिल्ली - मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांत ३ हजार ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
मराठवाड्यात २०२२ मध्ये १०२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०२३ मध्ये १ हजार ११६ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आणि २०२४ मध्ये हा आकडा ९५२ इतका होता. ही आकडेवारी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने (महसूल विभाग) दिल्याचे चौहान यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड विभागाने ‘भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या’ या शीर्षकाखाली ही माहिती संकलित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
कौटुंबिक समस्या, आजारपण, अमली पदार्थांचे व मद्याचे सेवन, विवाहविषयक समस्या, प्रेमसंबंध, दिवाळखोरी, कर्जबाजारीपणा, बेरोजगारी, गरिबी अशा विविध कारणांमुळे या आत्महत्या झाल्याचे नमूद करण्यात आल्याचे चौहान यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राज्य सरकारांनी केलेल्या उपाययोजनांना केंद्र सरकार योग्य धोरणात्मक निर्णयांद्वारे हातभार लावत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.