
- दिल्ली हिंसाचारप्रकरणी मोठी बातमी हाती येत आहे.
नवी दिल्ली- दिल्ली हिंसाचारप्रकरणी मोठी बातमी हाती येत आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच 3 निवृत्त न्यायाधिशांच्या समितीमार्फत याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. एका मराठी वृत्त वाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिली आहे.
26 जानेवारीला झालेल्या प्रजासत्ताक दिनाला हिंसाचाराचे गालबोट लागले. शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर परेड आयोजित केली होती. पण, परेड आपला निर्धारित मार्ग सोडून दिल्लीत शिरली. त्यामुळे पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापटी झाल्याचे समोर आले. पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. तसेच अश्रुधूर कांड्या फोडण्यात आल्या. संतप्त जवानांनीही आक्रमक पवित्रा घेतला. अनेक ठिकाणी पोलिसांवर शेतकऱ्यांनी काठ्यांनी हल्ला केला. शेतकरी तलवारी घेऊन पोलिसांच्या अंगावर गेल्याचा प्रकारही घडला.
ट्रॅक्टर परेडमध्ये सामिल झालेल्या शेतकऱ्यांनी लाल किल्ला गाठला. हळूहळू याठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झाले. अनेक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर चढत खालसा पंथाचा धार्मिक झेंडा फडकावला. काही ठिकाणी शेतकरी आंदोलनाचे झेंडे फडकवण्यात आल्याचेही पाहायला मिळाले. लाल किल्ल्यावर शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. त्यात शेतकऱ्यांसह पोलिस जखमी झाले आहेत. याचप्रकरणी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.