Delhi Violence: शशी थरुर यांच्यासह सहा पत्रकारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 9 February 2021

काँग्रेस नेते शशी शरुर यांच्यासह अन्य सहा वरिष्ठ पत्रकारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस नेते शशी शरुर यांच्यासह अन्य सहा वरिष्ठ पत्रकारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.  २६ जानेवारीला दिल्लीतील शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान दिशाभूल करणारे ट्विट केल्याप्रकरणी अटकेपासून दोन आठवड्यांसाठी लावण्यात आलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. सरन्यायाधीश एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या पीठाने याप्रकरणी दिल्ली पोलिसांसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा राज्यांना नोटिस जारी केली आहे. शशी शरुर यांच्यासह अन्य सहा वरिष्ठ पत्रकारांवर दिल्ली आंदोलनावेळी शेतकऱ्यांच्या मृत्यूविषयी दिशाभूल करणारे ट्विट केल्याच्या आरोपाप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. 

सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत आरोपींच्या अटेकवर स्थगिती आणली आहे. आता दोन आठवड्यांनी यावर सुनावणी होईल. दिल्ली पोलिसांनी अटकेला मिळालेल्या स्थगितीचा विरोध केलाय. दिल्ली पोलिसांच्या वतीने बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलं की, आम्ही आरोपींनी केलेल्या ट्विटमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिणामांना समोर मांडू. या आरोपींचे लाखो फॉलोवर्स आहेत. 

आरोपींनी जाणूनबुजून दिशाभूल करणारे आणि उकसवणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चुकीचे ट्विट केले. पोलिसांनी एका ट्रॅक्टर चालकाची हत्या केली आहे, अशा बातम्या प्रसारित केल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना गोळ्या घातल्या अशी चुकीची माहिती देण्यात आली. हे चुकीच्या उद्देशाने पसरवण्यात आले, ज्यामुळे दंगे पसरावेत आणि विविध समुदायांमध्ये तणाव निर्माण व्हावा, असं एफआयआरमध्ये म्हणण्यात आलं आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Protest shashi tharoor journalist tweet supreme court