भारत बंद - कृषी विधेयकाच्या निषेधार्थ बळीराजासाठी सर्वविरोधी पक्ष एकवटले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

पंजाबमधील शेतकऱ्यांनी आजपासून तीन दिवसांचे रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन फिरोजपूर रेल्वेस्थानकावरून धावणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली  - केंद्र सरकारच्या विविध कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी शुक्रवारी भारत बंदची हाक दिली आहे. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियानातील ३१ शेतकरी संघटनांनी या आधीच या विधेयकांविरोधात दंड थोपटले आहेत. आखिल भारतीय शेतकरी युनियन (एआयएफयू), भारतीय किसान युनियन (बीकेयू), आखिल भारतीय किसान महासंघ (एआयकेएम) आणि आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (एआयकेसीसी) आदी शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. 

विधेयकाला विरोध करताना सुरु असलेल्या या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. आंदोलनकांनी रेल्वे रोखून धरल्या असून रुळावरच ठिय्या मांडला आहे. पंजाबमध्ये अमृतसर-जयनगर क्लोन ट्रेन रद्द केली आहे. शेतकरी संघटनांनी एक ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला आहे. हरियाणातही 13 ट्रेन काही काळासाठी रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 
 

कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील काही शेतकरी संघटनांनी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, नॅशनल ट्रेड्स युनियन काँग्रेस, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, हिंद मजदूर सभा, ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर आणि ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन सेंटर या कामगार संघटनांनी शेतकऱ्यांचा आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

 

शेतकऱ्यांना सरकारने किमान हमी भावाची हमी दिली आली नाहीतर देशभर अराजक निर्माण होईल, असे ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीचे समन्वयक व्ही. एम. सिंग यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाबमधील शेतकऱ्यांनी आजपासून तीन दिवसांचे रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन फिरोजपूर रेल्वेस्थानकावरून धावणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आजपासून आगामी चार दिवस राज्यातील चौदा गाड्या बंद राहतील, प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुवर्ण मंदिर मेल (अमृसतर- मुंबई सेंट्रल), जनशताब्दी एक्स्प्रेस (हरिद्वार-अमृतसर), नवी दिल्ली- जम्मू तावी, कर्मभूमी (अमृसर-नवी जलपाईगुडी), सचखंड एक्स्प्रेस (नांदेड-अमृतसर) आणि शाहीद एक्स्प्रेस (अमृसतर-जयनगर) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers organizations bandh in India today