'नशीब हे बलात्कारासारखे असते, त्याचा आनंद तर घ्या'

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

'नशीब हे बलात्कारासारखे असते. तुम्ही त्याला रोखू शकत नाही. तर किमान त्याचा आनंद तर घ्या', असे केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी ईडन यांची पत्नी अन्ना लिंडा ईडन यांनी फेसबुकवर म्हटले होते.

तिरुवनंतपूरम : 'नशीब हे बलात्कारासारखे असते. तुम्ही त्याला रोखू शकत नाही. तर किमान त्याचा आनंद तर घ्या', असे केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी ईडन यांची पत्नी अन्ना लिंडा ईडन यांनी फेसबुकवर म्हटले होते. नशीबाची तुलना बलात्कारासारख्या घटनेशी केल्यामुळे नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनी ती पोस्ट काढून टाकली.

एका लोकप्रतिनिधीच्या पत्नीचे फेसबुकवर अशा प्रकारे लिहील्यामुळे त्या काही वेळामध्येच ट्रोल झाल्या. शिवाय, त्यांनी लिहीलेल्या पोस्टचे छायाचित्र काढून सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आले. नेटिझन्सनी त्यांच्यावर प्रतिक्रियांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.

अन्ना यांनी फेसबुक पोस्टवर लिहले होते की, 'नशीब हे बलात्कारासारखे असते. तुम्ही त्याला रोखू शकत नाही. किमान त्याचा आनंद तर घ्या'. संबंधित पोस्ट शेअर करताना दोन व्हिडिओही शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यानंतर मुले घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. दुसऱ्यामध्ये हिबी ईडन सिज्लर हा पदार्थ खात असल्याचे दिसत आहे. सोमवारी (ता. 21) केरळमधील कोच्ची शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. आज (मंगळवार) त्यांनी ही पोस्ट फेसबुकवर टाकली होती.

हिबी ईडन यांच्या पत्नी अन्ना मीडियाशी संबंधित आहेत. त्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. फेसबुकवर त्यांनी अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. आज त्यांनी जो व्हिडिओ शेअर केला तो वादग्रस्त ठरला आहे. अन्ना यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. आज त्या ट्रोल झाल्या असून, यासंदर्भात खासदार हिबी किंवा अन्ना यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fate is like rape enjoy if you can t resist: Kerala Congress MPs wife sparks row with Facebook post