हिंमत असेल, तर विचारांनी लढा : वेंकय्या नायडू 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जानेवारी 2017

काळा पैसा, बेहिशोबी पैसा पुन्हा मुख्य प्रवाहात आणला आहे. आता बेहिशोबी सोने आणि बेनामी संपत्तीवर कारवाई होईल. या सगळ्या निर्णयांमुळे गरीब-श्रीमंतांमधील दरी दूर होण्यास मदत होईल. 
- एम. वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री 

कोट्टयम : 'केरळमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले सुरुच ठेवले, तर त्याचे परिणाम वाईट होतील,' असा इशारा केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी काल (बुधवार) दिला. 'गेल्या आठ महिन्यांमध्ये केरळमध्ये 80 जणांची हत्या झाली आहे. याचे राजकीय प्रत्युत्तर दिले जाईल,' असेही नायडू म्हणाले. 

गेल्या काही महिन्यांपासून केरळमधील भाजप आणि कम्युनिस्ट पक्षातील तणाव कमालीचा वाढला आहे. गेल्या काही दिवसांत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरावही हल्ले झाले आहेत. याचा संदर्भ घेत नायडू म्हणाले, "केरळमध्ये सध्या काय चालू आहे, हे संपूर्ण देश बघत आहे. तुमच्यात हिंमत असेल, तर आमच्याशी राजकीय मैदानात आणि वैचारिक पातळीवर लढा! रक्तरंजित लढाईमुळे तुम्हाला यापुढे यश मिळणार नाही. आता परिस्थिती बदलत आहे. देशात गरीब आणि श्रीमंतांमध्ये असलेली प्रचंड दरी ही काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांचा परिणाम आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष दिल्लीत एकत्र असतात आणि केरळमध्ये एकमेकांच्या विरोधात असतात. यामुळे राजकीय संस्कृती पार लयाला गेली आहे. पुढील निवडणुकीत केरळमध्ये भाजप सत्तेत येईल, हा विश्‍वास आहे.'' 

नोटाबंदीच्या मुद्यावरूनही नायडू यांनी काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षावर टीका केली. 'केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे संपूर्ण देशाने स्वागत केले; पण काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला. देशातील बँक व्यवस्थेपासून दूर असलेला पैसा पुन्हा मुख्य प्रवाहात आणायचा होता. या निर्णयापूर्वी हा पैसा लपवून ठेवला होता, त्याचा काहीही हिशोब नव्हता. आता हा सगळा पैसा बँक व्यवस्थेत दाखल झाला आहे,' असे नायडू म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Fight us ideologically,' M Venkaiah Naidu to CPM in Kerala