दसरा-दिवाळीपूर्वी मोदी सरकारची भेट, LTC आणि 10 हजार रुपये फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

सरकारी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये आगाऊ देण्यात येणार आहे. ही रक्कम व्याजविरहित असून 10 हप्त्यांमधून त्याची परतफेड करता येईल. 

नवी दिल्ली- केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेत मागणी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत अर्थव्यवस्थेत मागणी वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जात असल्याचे सांगितले. कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यामुळे मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ग्राहक खर्च आणि भांडवली खर्च वाढविण्यासाठी उपाययोजना करीत आहे. सरकार एलटीसी कॅश व्हाऊचर्स आणि फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स योजना घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. 

मागणी वाढावी यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम दिली जाईल. एलटीसी कॅश व्हाऊचर योजना आणि विशेष उत्सव अग्रिम योजना सुरु केली जाईल. या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये आगाऊ देण्यात येणार आहे. ही रक्कम व्याजविरहित असून 10 हप्त्यांमधून त्याची परतफेड करता येईल. 

एलटीसीसाठी सरकारवर 5675 कोटी रुपयांचा बोजा पडेल. सार्वजनिक उपक्रम आणि बँकांना 1900 कोटी रुपये दिले जातील. 

प्रवास भत्त्यासाठी कॅश व्हाऊचर स्कीम सरकारने आणली आहे. त्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कॅश व्हाऊचर मिळेल. त्याचा उपयोग खर्च करण्यासाठी केला जाईल. यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती येईल. त्याचा लाभ सार्वजनिक उपक्रम आणि सार्वजनिक बँकेतील कर्मचाऱ्यांना मिळेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finance Minister Nirmala Sitharaman on economy stimulus package Special Festival Advance Scheme ltc