esakal | आधी राज्यात, नंतर केंद्रात आघाडी हवी
sakal

बोलून बातमी शोधा

सीताराम येचुरी

आधी राज्यात, नंतर केंद्रात आघाडी हवी

sakal_logo
By
मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : भाजपचे विनाशकारी, आर्थिक संकटाकडे देशाला नेणारे धोरण हाणून पाडण्यासाठी भाजपच्या अजेंड्यावर चालल्यास विरोधकांना काही फायदा होणार नाही. भाजप विरोधातील एकजूट ही केवळ व्यक्तीविरोधी असण्याच्या पलीकडे जाऊन विरोधकांना आपला वेगळा कार्यक्रम एकजुटीने आणावा लागेल.

हेही वाचा: जागतिक नेत्यांमध्ये मोदी पुन्हा 'नंबर वन'; बायडन यांच्यासह अनेक दिग्गज मागे

निवडणुकांआधी राज्यांत व निवडणुकीनंतर केंद्रात धर्मनिरपेक्ष पक्षांची भाजपच्या विरोधात आघाडी होणे ही काळाची गरज आहे, असे मत माकपचे राष्ट्रीय महासचिव सीताराम येचुरी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. मात्र यासाठी आधी पश्चिम बंगालमध्ये व केरळमध्ये तेथील माकपच्या मुख्य विरोधकांबरोबर अशा आघाडीसाठी त्यांचा स्वतःचा पक्ष तयार आहे का, या प्रश्नाचे उत्तर येचुरी यांनी दिले नाही.

येचुरी म्हणाले, की हा प्रादेशिक तो राष्ट्रीय असा पक्षभेद करून विरोधकांची आघाडी अस्तित्वात येणार नाही, हे आपण स्पष्ट केले होते. राष्ट्रीय समन्वय समिती बनविण्याची कल्पना यात पुढे आली तरी ती आगामी लोकसभा निवडणुकीआधी प्रत्यक्षात येणे कठीण आहे. अलीकडे विधानसभा निवडणुकांमध्ये आसाम वगळता इतर चारही राज्यांत भाजपचा साफ पराभव झाला आहे व त्यामुळे केंद्रातही मोदी-शहा यांना आपण हरवू शकतो, असा विश्वास निर्माण होण्यात मदत झाली आहे. पण हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा विरोधक एकत्र येतील.

भाजपकडून वेगवेगळे हातखंडे

येचुरी म्हणाले, की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात उत्तर प्रदेश व त्यातही ओबीसींना झुकते माप देणे, विकासाच्या पोकळ गप्पा मारताना प्रत्यक्षात धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबविणे, विरोधकांना घाबरवण्यासाठी छापेमारी, पैशांचे आमिष दाखवणे व एखाद्याने ऐकले नाही तर त्याला तुरूंगात टाकणे या नेहमीच्या तीन मार्गांनी भाजप नेतृत्व चालले आहे. उत्तर प्रदेशात आगामी काळात याला जोर चढणार.

हेही वाचा: आसामच्या अखंडतेसाठी अखेर 'कार्बी आंगलॉंग करारा'वर स्वाक्षऱ्या

महागाई, कोरोना काळातील ढिसाळपणा, शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे केंद्राकडून होणारे दुर्लक्ष व केंद्र-राज्याचे अपयश, या कोरोनानंतर उग्र झालेली बेरोजगारी यासारख्या प्रश्नांकडे लोकांचे लक्षच जाऊ नये, यासाठी भाजप वेगवेगळे हातखंडे वापरणार हे उघड आहे. ही लबाडी लोकांच्या नजरेला आणायची तर आधी त्या त्या राज्यांत विरोधकांनी एकजूट केली पाहिजे.

अनेक प्रतिके, जुन्या इमारती नष्ट होताहेत

केंद्रातील मोदी सरकार सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या नावाखाली अनेक मंत्रालयांपासून राष्ट्रीय पुरातत्त्व भवन, राष्ट्रीय कला केंद्र, अभिलेखागार आदी अनेक प्रतीके व जुन्या इमारती नष्ट करत आहे, असा हल्ला येचुरी यांनी चढविला. नवा भारत म्हणजे अंतिमतः हिंदूराष्ट्र लादायचे, हे संघ-भाजपचे कारस्थान आहे.

नव्या भारताची नवी प्रतीके म्हणजे संसद व सेंट्रल व्हिस्टा हे यांच्या मनात आहे. दुसरे प्रतीक म्हणजे अयोध्येतील मंदिर. हे सारे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सुरू करून संघाच्या शताब्दी वर्षापर्यंत (२०२५) पूर्ण करण्याचे यांचे प्रयत्न स्पष्ट दिसत आहेत व देशवासीय या बाबी जेवढ्या लवकरात लवकर ओळखतील तो सुदिन, असेही येचुरी म्हणाले.

loading image
go to top