भाजपचे ‘अब तक सत्तावन’

सकाळ न्यूज नेटवर्क 
Saturday, 18 January 2020

भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ७० पैकी ५७ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ७० पैकी ५७ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात ११ उमेदवार अनुसूचित जातीचे असून, चार महिला उमेदवार आहेत. विजेंद्र गुप्ता यांच्यासह तिन्ही आमदारांना तिकिटे देण्यात आली आहेत. दिल्लीत भाजपसमोर आपचे मोठे आव्हान आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने २०१५ मध्ये आपटलेल्या २६ उमेदवारांना पुन्हा तिकिटे दिली आहेत. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण, तसेच खुद्द अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्लीतून कोण उभे राहणार, हे प्रश्‍न मात्र भाजपने अनुत्तरितच ठेवले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमोर पटपडगंजमधून रवी नेगी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर, दिल्लीचे श्‍याम जाजू व तरुण चुग यांच्या उपस्थितीत आज भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली. उर्वरित १३ उमेदवारही लवकरच जाहीर होतील, असे ते म्हणाले. दिल्लीत ८ फेब्रुवारीला मतदान व संसद अधिवेशन पूर्वार्धाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या मॅरेथॉन बैठकीत बहुतांश उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यात आली. 

आपमधून आलेल्या कपिल मिश्रा यांच्यासारख्या मोजक्‍याच चेहऱ्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले. मोजक्‍या चार महिला उमेदवारांत विभा गुप्ता, लता सोढी, शिखा राय व किरण वैद्य यांचा समावेश आहे. सर्वश्री गुप्ता (रोहिणी), जगदीश प्रधान (मुस्तफाबाद) व ओ. पी. शर्मा (विश्‍वासनगर) या तिन्ही आमदारांना आहे तेथेच कायम ठेवण्यात आले आहे. मात्र अकाली दल व इतर मित्रपक्षांना किती जागा देणार याबाबत भाजपने खुलासा केलेला नाही. 

भाजपचे प्रमुख उमेदवार
    विजेंद्र गुप्ता (रोहिणी)
    कपिल मिश्रा (मॉडेल टाउन)
    सुमनकुमार गुप्ता (चांदनी चौक)
    योगेंद्र चंदोलिया (करोल बाग)
    परवेश रतन (पटेलनगर)
    आशिष सूद (जनकपुरी)
    संजय सिंह (विकासपुरी)
    प्रद्युम्न राजपूत (द्वारका)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First list of BJP announced today