‘यानम’ उलगडणार मंगळयान मोहीम

संस्कृतमधील पहिला वैज्ञानिक माहितीपट प्रेक्षकांच्या भेटीला
First scientific documentary Yanam on Mars mission in Sanskrit
First scientific documentary Yanam on Mars mission in Sanskrit

तिरुअनंतपुरम - भारताच्या यशस्वी मंगळयान मोहिमेवर ‘यानम’ या संस्कृतमधील पहिल्या वैज्ञानिक माहितीपटाची निर्मिती करण्यात आली असून याच महिन्यात हा माहितीपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या २१ तारखेला चेन्नईत निवडक प्रेक्षकांच्या उपस्थितीत या चित्रपटाच्या प्रिमिअर शो चे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृतमधील हा जगातील पहिला वैज्ञानिक माहितीपट असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे, मंगळयानाच्या यशस्वी उड्डाणानंतर संस्कृत या अभिजात भारतीय भाषेने वैज्ञानिक चित्रपटनिर्मिती करून झेप घेतली आहे.

भारताची ऐतिहासिक मंगळयान मोहीम मंगळ परिक्रमा मोहीम (एमओएम) म्हणूनही ओळखली जाते. भारतीय अंतराळ व संशोधन संस्थेने (इस्रो) २०१३ मध्ये मंगळयानाचे प्रक्षेपण केले होते. त्यामुळे, मंगळ ग्रहाच्या कक्षेत यान पाठविणारी इस्रो ही जगातील चौथी अशी संस्था ठरली होती. त्याचप्रमाणे, भारत पहिला आशियायी तसेच पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी करणाराही जगातील पहिलाच देश ठरला होता. देशाच्या याच कौतुकास्पद कामगिरीवर ‘यानम’ हा संस्कृत माहितीपट बनविण्यात आला आहे.

येत्या २१ तारखेला चेन्नईत इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या उपस्थितीत या माहितीपटाचा प्रिमिअर शो आयोजित करण्यात आला आहे. यावेळी, इस्रोचे माजी अध्यक्ष के.राधाकृष्णन आणि केरळमधील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे अध्यक्ष एस. उन्नीकृष्णन नायर यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. त्याचप्रमाणे, दक्षिण भारतीय चित्रपट संघटनेचे सचिव रवी कोट्टारकारा हेही प्रिमिअर शो साठी उपस्थित राहणार आहेत.

ते म्हणाले, की राष्ट्रीय पुरस्कारविजेते दिग्दर्शक विनोद मानकरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वैज्ञानिक व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हा माहितीपट दाखविण्याचे तसेच त्याचा जागतिक स्तरावर प्रिमिअर आयोजित करण्याचे दिग्दर्शक कोट्टारकारा यांची इच्छा आहे. के. राधाकृष्णन यांच्या ‘माय ओडिसी ; मेमोयर्स ऑफ द मॅन बिहाइंड द मंगलयान मिशन’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. इस्रोच्या सहकार्याने हा चित्रपट बनविण्यात आला आहे. हा पाऊण तासांचा माहितीपट पूर्णपणे संस्कृत भाषेत आहे.

अंतराळ क्षेत्रात भरारी घेणाऱ्या इस्रो आणि या संस्थेच्या वैज्ञानिकांच्या क्षमता जगासमोर मांडणे, हा या माहितीपटाचा प्रमुख उद्देश आहे. भारतीय वैज्ञानिकांनी आपल्या मर्यादांवर मात करत पहिल्याच प्रयत्नात गुंतागुंतीची मंगळ मोहीम कशी यशस्वी केली, यावर या माहितीपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

- रवी कोट्टारकारा, सचिव, दक्षिण भारतीय चित्रपट संघटना.

‘यानम’ ची वैशिष्ट्ये

वेळ : ४५ मिनिटे

भाषा : संस्कृत

प्रिमिअर : २१ ऑगस्ट, चेन्नई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com