‘गगनयान’चे प्रक्षेपण लांबणीवर शक्य 

पीटीआय
Thursday, 11 June 2020

लॉकडाउनमध्ये तयारीमध्ये अनेक अडथळे आल्याने उड्डाण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसून अजून सहा महिन्यांचा काळ हातात आहे, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बंगळूर - भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेचा एक भाग म्हणून आखलेली मानवरहित मोहिम यंदाच्या वर्षी न होण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे तयारीत अनेक अडथळे निर्माण झाल्यामुळे हा विलंब होत असल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

भारताची पहिली मानवी अवकाश मोहिम म्हणून ‘गगनयान’ची तयारी सुरु असून त्याच्या चाचणीचा एक भाग म्हणून या वर्षाच्या अखेरीस आणि पुढील वर्षी जुलैमध्ये दोन मानवरहित उड्डाणे केली जाणार होती. मात्र, लॉकडाउनमध्ये तयारीमध्ये अनेक अडथळे आल्याने उड्डाण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसून अजून सहा महिन्यांचा काळ हातात आहे, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘नियोजनात थोडे मागे-पुढे होऊ शकते. मात्र, सर्व बाबींचा आढावा घेतल्यावरच स्पष्टता येईल. प्रकल्पावर काम करणाऱ्यांना अद्याप तरी उड्डाण पुढे ढकलल्याचे सांगितलेले नाही,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले. पहिल्या चाचणी उड्डाणात ‘व्योममित्र’ हा रोबो पाठविण्याचा भारताचा विचार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, म्हणजेच २०२२ मध्ये ‘गगनयान’चे प्रक्षेपण करण्याचा ‘इस्रो’चे नियोजन आहे. या मोहिमेसाठी दहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. ‘गगनयान’बरोबर अवकाशात जाण्यासाठी निवड झालेल्या चार संभाव्य अंतराळवीरांचे सध्या मॉस्को येथे प्रशिक्षणही सुरु आहे. सर्वच मोहिमा लांबणीवर पडत असल्याने ‘चांद्रयान-३’लाही विलंब होण्याची शक्यता आहे. 

सध्याची परिस्थिती पाहता मानवरहित मोहिम सध्या शक्य दिसत नाही. आम्ही सध्या जी-सॅट १ सह पाच ते सहा मोहिमांवर लक्ष केंद्रीत केले आहे. 
- के. सिवन, इस्रोचे प्रमुख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First trial flight of Gaganyaan may face some delay

Tags
टॉपिकस
Topic Tags: