esakal | उत्तर भारतात पावसाचा कहर; गाझियाबादमध्ये करंट लागुन ५ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Five people people died due to electrocution in Ghaziabad

उत्तर भारतात पावसाचं थैमान; गाझियाबादमध्ये पाच जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सुधीर काकडे

मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून अनेक राज्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. पावसाचा सर्वाधिक फटका उत्तर भारताला बसल्याचं दिसत आहे. राजधानी दिल्लीसह गाझियाबाद परिसरात सुसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. यातच गाझियाबादमध्ये शॉर्टसर्किटची घटना घडली आहे. एकीकडे मुसळधार पाऊस सुरु असतानाच गाझियाबादमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. गाझियाबादच्या सिहानी गेट परिसरात बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली आहे.

प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, गाझियाबाद येथे राकेश रोडवरील एका दुकानाजवळील पोलमध्ये करंट उतरला. जवळच असणाऱ्या पाच जणांचा यामध्ये मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये जानकी (35 वर्ष), सिमरन(11वर्ष) , लक्ष्मीशंकर (24 वर्ष) यांचा समावेश आहे. पाऊस सुरु असताना शॉर्टसर्किट होऊन ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

दिल्ली आणि परिसरात सकाळपासून धुवांधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते तुंबल्याचे पहायला मिळते आहे. दिल्लीतील मिंटो ब्रिज, आईटीओसह विमानतळ परिसरात जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज सुद्धा दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानमधील (Rajasthan) अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह मध्यम आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या मुनिरका परिसरात रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिल्ली आणि आजुबाजूच्या परिसरात ढगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नॉएडा, ग्रेटर नॉएडा, गाझियाबादमध्ये सुद्धा पावसाचा जोर राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा: Corona Update: देशात पुन्हा 45 हजारांपेक्षा अधिक रुग्ण संख्या

दिल्ली व्यतिरीक्त नॅशनल कॅपीटल रीजन परिसरातील गुरुग्राम, मानेसर, फरीदाबाद, बल्लभगड, तोशाम, भिवानी, झज्जर, नरनौल, महेंद्रगड आणि कोसाईमध्ये पुढच्या काही तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तरप्रदेशमध्ये सुद्धा पहासू, सियाना, खुर्जा, बागपत, मोदीनगर, हापुड, बुलंदशहर, पिलखुओ, मेरठ भागांत पावसाचा मोठा फटका बसला आहे. राजस्थानच्या विराटनगर, कोटपुतली, भिवाडी, लक्ष्मणगड, नादबाई, नागर, अलवर, तिजारा, डीग सारख्या परिसरातसुद्धा पाऊस सुरु आहे.

loading image
go to top