
वास्तवासाठी भारतीयांचा भर सोशल मीडियावर
नवी दिल्ली - एकीकडे सोशल मीडियातून व्हायरल होणाऱ्या बनावट माहितीने सगळ्यांचीच डोकेदुखी वाढली असताना भारतातील ५४ टक्के नागरिक हे आजही वास्तविक माहितीसाठी सोशल मीडियाचा आधार घेत असल्याचे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने केलेल्या संशोधनातून उघड झाले आहे.
‘ऑक्सफर्ड’ने यासाठी ‘दि मॅटर ऑफ फॅक्ट’ नावाची संशोधनपर मोहीम सुरू केली होती त्यातून लोक हे कशा पद्धतीने सत्य ओळखतात आणि माहितीच्या स्रोतांची पडताळणी करतात हे तपासून पाहण्यात आले होते. सध्या जगभर सोशल मीडियातून व्हायरल होणाऱ्या बनावट माहितीमुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे चुकीच्या माहितीचे पेव फुटले असतानाही अनेक नेटीझन्स हे ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून व्हायरल होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवत असल्याचे दिसून आले आहे. उदयोन्मुख आर्थिक सत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांमध्ये हे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे.
जगभरातील एकूण नेटीझन्सच्या संख्येचा विचार केला असता ३७ टक्के लोक हे वास्तविक माहितीसाठी सोशल मीडियाकडे जात असल्याचे दिसून आले आहे. दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमध्ये हेच प्रमाण ४३ टक्के तर भारतामध्ये ते ५४ टक्के एवढे असल्याचे दिसून आले आहे. ब्रिटनमध्ये हे प्रमाण तुलनेने खूपच कमी असून तेथील केवळ सोळा टक्के लोक माहितीचा स्रोत म्हणून सोशल मीडियाचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेमध्ये हे प्रमाण केवळ ३३ टक्के एवढेच आहे. बहुसंख्य लोक हे सर्चिंगसाठी गुगल आणि अन्य सर्च इंजिनचाच आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. जगभरातील अशा लोकांचे प्रमाण हे ६७ टक्के तर ब्रिटनमधील हेच प्रमाण ६२ टक्के एवढे असल्याचे दिसून आले आहे. तीन चतुर्थांश लोकांना ते सोशल मीडियावर शेअर करत असलेली माहिती अचूक आहे असे वाटते.
पुस्तकापासून लोक दुरावले
माहिती संकलनासाठी पुस्तकांवर विसंबून राहण्याच्या पारंपरिक मार्गापासून लोक दुरावल्याचेही स्पष्ट झाले आहे. एकतृतीयांशापेक्षाही कमी मंडळी ही माहितीसाठी एन्सायक्लोपीडिया आणि अन्य वैचारिक ग्रंथांचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. लोकांच्या सोशल मीडियावरील विश्वास ठेवण्याच्या प्रमाणामध्ये मोठी भौगोलिक तफावत असल्याचे उघड झाले आहे. भारतातील ८० टक्के आणि मेक्सिकोतील ६० टक्के नागरिकांना सोशल मीडियाचे नेटवर्क महत्त्वाचे वाटते. ब्रिटनमध्ये हेच प्रमाण २७ टक्के तर अमेरिकेमध्ये ४२ टक्के एवढे असल्याचे आढळून आले आहे.
भारतात प्रमाण अधिक
भारताचा विचार केला तर सोशल मीडियावर माहिती शेअर करणाऱ्या ८७ टक्के लोकांना आपण जे शेअर करतोय ते विश्वासार्ह आहे, असे वाटते. जगभराशी तुलना केली असता हे प्रमाण खूप अधिक असल्याचे दिसून येते. या संशोधनामध्ये अभ्यासकांनी ब्रिटन, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, भारत आणि मेक्सिकोतील तब्बल पाच हजार लोकांची मते जाणून घेण्यात आली होती. या देशांतील ५२ टक्के मंडळी ही वास्तविक माहिती आणि कल्पनाविलास यांच्यात फरक करण्यासाठी फेसबुक, यूट्युब आणि इन्स्टाग्रामचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे.
वयाचा असाही परिणाम
ज्यांचे वय ५५ पेक्षा कमी आहे असे लोक सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेली माहिती अचूक असल्याचे मानतात. २५ ते ४४ वर्षे वयोगटातील ३५ टक्के लोकांना ते जे सोशल मीडियावर शेअर करतात ते सत्य असल्याचे वाटते. ज्यांचे वय ५५ च्या पुढे आहे अशा केवळ तेरा टक्के लोकांना ते जे शेअर करतात ते विश्वासार्ह वाटत असल्याचे आढळून आले आहे.
तरुणाई सोशल मीडियावर
तरुण मंडळी ही सोशल मीडियावर वास्तविक माहितीचा शोध घेत असल्याचे दिसून आले आहे, त्यांच्यासाठी तोच माहितीचा स्रोत असतो. २५ ते ४४ वर्षे वयोगटातील ४४ टक्के नेटीझन्स हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे वळत असल्याचे दिसून आले पण वयाची ५५ वर्षे ओलांडणाऱ्यांसाठी हेच प्रमाण बारा टक्के एवढे असल्याचेही या संशोधनातून उघड झाले आहे.
Web Title: For Real Indians Focus On Social Media Research By Oxford Press
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..