esakal | कोरोना काळात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत ५० टक्क्यांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Forbes India Rich List 2021

कोरोना काळात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत ५० टक्क्यांची वाढ

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Forbes India Rich List 2021 'फोर्ब्ज' या अमेरिकेतील सर्वांत प्रसिद्ध मासिकाकडून दरवर्षी भारतातील सर्वांत श्रीमंत अशा १०० व्यक्तींची यादी जाहीर करण्यात येते. नुकतीच ही यादी जाहीर झाली असून त्यानुसार कोरोना काळात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत तब्बल ५० टक्क्यांची वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात भारतातील सर्वांत श्रीमंत १०० व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल २५७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. या सर्वांची संपत्ती मिळून हा आकडा ७७५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. १०० पैकी ८० हून जास्त अब्जाधीशांच्या संपत्तीत या वर्षी भर झाली आहे. तर ६१ जणांच्या संपत्तीत एक अब्ज डॉलर्सहून अधिक वाढ झाली आहे. म्हणजेच कोरोना काळात श्रीमंत व्यक्ती अधिक श्रीमंत झाले आहेत.

देशातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी बाजी मारली आहे. या यादीत ते पहिल्या स्थानी असून त्यांची एकूण संपत्ती ९२.७ अब्ज डॉलर्स इतकी आहे. गेल्या १४ वर्षांपासून त्यांना मात देणं कोणालाही शक्य झालेलं नाही. २००८ पासून मुकेश अंबानी फोर्ब्जच्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.

उद्योगपती गौतम अदानी हे सलग तिसऱ्या वर्षी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ७४.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. याआधी त्यांच्या संपत्तीचा आकडा २५.२ अब्ज डॉलर्स होता. त्यामुळे अदानी यांनीसुद्धा चांगलीच झेप घेतली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती ३१ अब्ज डॉलर्स आहे. नाडर यांच्या संपत्तीतही १०.६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

हेही वाचा: Forbes India Rich List 2021: मुकेश अंबानीच सर्वांत श्रीमंत भारतीय

डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी हे चौथ्या क्रमांकावर आहेत. राधाकिशन यांच्या संपत्तीतही दुप्पट वाढ झाली आहे. १५.४ अब्ज डॉलर्सवरून आता त्यांची संपत्ती २९.४ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी डी- मार्टच्या २२ नवीन स्टोअर उघडल्या आहेत.

अब्जाधीशांची यादी-

पाचव्या स्थानी- सायरस पुनावाला

संपत्ती- १९ अब्ज डॉलर्स

सहाव्या स्थानी- लक्ष्मी मित्तल

संपत्ती- १८.८ अब्ज डॉलर्स

सातव्या स्थानी- सावित्री जिंदल

संपत्ती- १८ अब्ज डॉलर्स

आठव्या स्थानी- उदय कोटक

संपत्ती- १६.५ अब्ज डॉलर्स

नवव्या स्थानी- पालोनजी मिस्त्री

संपत्ती- १६.४ अब्ज डॉलर्स

दहाव्या स्थानी- कुमार बिर्ला

संपत्ती- १५.८ अब्ज डॉलर्स

loading image
go to top