esakal | चारा घोटाळा - लालूंना जामीन मंजूर; मुक्काम मात्र तुरुंगातच
sakal

बोलून बातमी शोधा

lalu prasad yadav

रांचीच्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लालूंना पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात निम्मी शिक्षा भोगली असून त्या आधारावर जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांना अर्जात केली होती.

चारा घोटाळा - लालूंना जामीन मंजूर; मुक्काम मात्र तुरुंगातच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रांची - चारा गैरव्यवहाराशीसंबंधित चाईबासा प्रकरणात कारावासाची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना शुक्रवारी जामीन मंजूर झाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीला काही दिवस राहिलेले असताना लालूंना जामीन मिळणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मात्र दुमका कोषागराच्या प्रकरणाची सुनावणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत.

चाईबासा कोषागारातून अवैधरीत्या निधी काढल्याप्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यांना जामीन मंजूर केला आहे. या गुन्ह्यात रांचीच्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लालूंना पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात निम्मी शिक्षा भोगली असून त्या आधारावर जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांना अर्जात केली होती.

न्यायालयाने त्यांच्या जामिनाला मान्यता देताना ५० हजार रुपयांचा जातमुचलका आणि दोन लाख रुपये दंड भरण्याचा आदेश दिला. लालू प्रसाद यादव यांचा वैद्यकीय अहवाल आणि त्यांना किती लोक भेटले याची माहिती देण्याचे निर्देशही दिले आहेत. या अहवालावर सहा नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

लालू प्रसाद यादव यांना विविध गुन्ह्यातील तुरुंगवासाची शिक्षा
१)चाईबासा कोशागारातून अवैधरीत्या ३७.७ कोटी रुपये काढणे ः पाच वर्षे (जामीन मंजूर)
२) देवघर सरकारी कोशागारातून बेकायदा ८४.५३ लाख रुपये काढणे ः साडेतीन वर्षे आणि पाच लाखांचा दंड (जामीन मंजूर)
३) चाईबासा कोशागारातून अवैधरीत्या ३३.६७ कोटी काढणे ः पाच वर्षे (जामीन मंजूर)
४) दुमका कोशागारातून अवैधरीत्या ३. १३ कोटी रुपये काढणे ः दोन वेगवेगळ्या कलमाखाली सात-सात वर्षांची शिक्षा, ६० वर्षे दंड (जामिनासाठी अर्ज केलेला नाही)