esakal | माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

 bjp jaswant singh passes away

अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंह यांनी1996 ते 2004 या कालावधीत संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली होती.

माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. गेल्या सहा वर्षांपासून जसवंत सिंह कोमामध्ये होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंह यांनी1996 ते 2004 या कालावधीत संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली होती. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जसवंत सिंह यांना तिकिट दिलं नव्हतं. तेव्हा नाराज झालेल्या जसवंत सिंह यांनी पक्षाला राम राम करत अपक्ष निवडणूक लढली होती. त्याच वर्षी डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून जसवंत सिंह हे कोमात होते. 

भारताच्या लष्करातून निवृत्त झाल्यानंतर जसवंत सिंह यांनी राजकारणात पाऊल टाकलं होतं. भाजपची स्थापना करणाऱ्या नेत्यांमध्ये जसवंत सिंह हेसुद्धा होते. राज्यसभा आणि लोकसभेत त्यांनी भाजपचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी अर्थमंत्री असताना स्टेट व्हॅल्यू अॅडेड टॅक्सची सुरुवात केली. त्यामुळे राज्याला जास्त महसूल मिळू लागला. तसंच कस्टम ड्युटी कमी करण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता. 

जसवंत सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जसवंत सिंह यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झालं आहे अशा शब्दात शोक व्यक्त केला. संरक्षण खात्यासह अनेक पदे भूषवत त्यांनी देशाची सेवा केली. मंत्री आणि खासदार म्हणून त्यांचा कार्यकाळ आठवणीत राहणार आहे. राजस्थानमध्ये भाजपला मजबूत करण्यात जसवंत सिंह यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असं राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे.