मुस्लिम असुरक्षिततेबाबत वारंवार विचारले प्रश्न; हमीद अन्सारी यांनी मधूनच सोडली मुलाखत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 January 2021

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या एका नव्या पुस्तकाच्या निमित्ताने एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते.

नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या एका नव्या पुस्तकाच्या निमित्ताने 'झी न्यूज' या खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, सेक्यूलॅरिझम आता सरकारच्या शब्दकोषात नाही आहे, जो 2014 च्या आधीपर्यंत होता. मात्र, 'मुस्लिमांच्या असुरक्षितते'बाबत केलेल्या आपल्या बहुचर्चित विधानाबाबत वारंवार विचारल्यानंतर त्यांनी एँकरच्या मानसिकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच त्यांनी मधूनच मुलाखत सोडून दिली आणि ते उठून गेले.

खासगी चॅनेलवर काल शनिवारी रात्री प्रसारित होणाऱ्या मुलाखतीमध्ये अन्सारी यांनी आपल्या पुस्तकात लिहलेल्या गोष्टींचा पुन्हा पुनरुच्चार केला. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, सरकारच्या शब्दकोषात सेक्यूलॅरिझम हा शब्द नाहीये. यावर त्यांना विचारलं गेलं की 2014 आधी सरकारच्या शब्दकोषात हा शब्द होता का? यावर त्यांनी 'हो' मात्र पुरेशा प्रमाणात नाही, असं उत्तर दिलं. त्यांनी हा देखील आरोप लावला की उत्तर प्रदेशात लोकांना धर्माच्या नावावर तुरुंगात डांबलं जात आहे. हमीद अन्सारी यांनी लव्ह जिहाद आणि तीन तलाकच्या मुद्यावर बोलताना म्हटलं की उत्तर प्रदेशात लोकांना डांबलं जात आहे. तीन तलाकला कधीच धार्मिक मान्यता नव्हती तर तो सामाजिक दोष होता. याविरोधात कायदा बनणे ठिक होतं पण त्याला कोणत्या प्रकारे लागू केलं जात आहे.

हेही वाचा - अन्सारी आणि भाजप पुन्हा आमने सामने

माजी उपराष्ट्रपतींना एँकरने एकामागोमाग एक वादग्रस्त मुद्यांवर प्रश्न विचारणे सुरु केले. यामध्ये हिंदू दहशतवाद ते मुस्लिमांमध्ये असुरक्षितता, तसेच मॉब लिंचिगबाबतचे प्रश्न होते. एँकरच्या विचारण्याच्या पद्धतीमुळे ते नाराज झाले आणि ते मधूनच मुलाखतीतून उभे राहिले आणि त्यांनी थँक्यू म्हणत माईक काढून दिला.  त्यांना एँकरने विचारलं की, हिंदू दहशतवाद म्हटलं जात होतं, तेंव्हा सरकारच्या डिक्शनरीमध्ये सेक्यूलॅरिझम हा शब्द होता का? या प्रश्नावर ते खूपच नाराज झाले. ते म्हणाले की, याप्रकारचे वक्तव्य मी केलेले नाही. कुणी A, B, C ने केलेली वक्तव्ये माझ्याशी जोडू नका. ज्यांनी हे वक्तव्य केलं आहे, त्यांनाच त्याबाबत विचारा. 

एँकरने अन्सारी यांनी विचारलं की, आपण 10 वर्षांपर्यंत उपराष्ट्रपती होता. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होता. अल्पसंख्याक आयोगाचे प्रमुख होता. देशाने आपल्याला एवढं सगळं दिलं मात्र आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसांत आपण म्हटलं की मुस्लिम देशात असुरक्षित आहेत, याचं कारण काय? यावर उत्तर देताना अन्सारी म्हणाले की असं त्यांनी जनतेच्या धारणेवरुन म्हटलं होतं.  याच कार्यक्रमात त्यांनी झुंडशाहीबाबत ही वक्तव्य केलं. यावर त्यांना प्रतिप्रश्न करुन विचारण्यात आलं की, झुंडीने हिंसा हिंदुचींही होते. तेंव्हा अन्सारी यांनी म्हटलं की होत असेल. एँकरने त्यांना वारंवार हाच प्रश्न विचारला की, आपल्याला असं का वाटतंय की मुस्लिम असुरक्षित आहेत? वारंवार मुस्लिम असुरक्षिततेवरुन प्रश्न विचारल्यामुळे ते नाराज झाले आणि मुलाखत सोडून उठून गेले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former vice president hamid ansari leaves interview by counter questions on secularism