G20 Summit : भारत इंडोनेशियाच्या पाठीशी; पंतप्रधान नरेंद्र मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

G20 Summit

G20 Summit : भारत इंडोनेशियाच्या पाठीशी; पंतप्रधान नरेंद्र मोदी

बाली : आव्हानात्मक काळात भारत इंडोनेशियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले. जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. भारत व इंडोनेशिया या दोन्ही देशांतील सामाईक वारसा व संस्कृतीही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली. इंडोनेशियातील २०१८ मधील प्रलयकारी भूकंपाच्या आठवणी जागवत भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून राबविलेल्या ‘ऑपरेशन समुद्र मैत्री’चा उल्लेखही पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून केला.

मोदी यावेळी म्हणाले, की भारत व इंडोनेशियातील संबंध चांगल्या तसेच कठीण काळातही मजबूत राहिले आहेत. आव्हानात्मक काळात भारत नेहमीच इंडोनेशियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. मोदी यांनी २०१८ मध्ये इंडोनेशियाला भेट दिली होती.

त्यावेळी ते म्हणाले होते की भारत आणि इंडोनेशिया यांच्यात ९० सागरी मैल अंतर असू शकते, पण प्रत्यक्षात, आम्ही ९० सागरी मैल दूर नाही तर ९० मैल जवळ आहोत. ज्यावेळी भारतात राम मंदिराची उभारणी होत आहे. त्यावेळी इंडोनेशियातील रामायणाच्या परंपरेचीही आम्हाला अभिमानाने आठवण होते, असेही ते म्हणाले होते. भारताच्या स्वातंत्र्यदिनानंतर म्हणजे दोनच दिवसांची १७ ऑगस्ट रोजी इंडोनेशियाचा स्वातंत्र्यदिन असतो, याचा उल्लेखही त्यांनी केला होता.

मोदींची बायडेन, सुनक यांच्याशी अनौपचारिक चर्चा

जी २० परिषदेसाठी आलेले अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इम्युनअल मॅक्रान व इतर जागतिक नेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनौपचारिक चर्चा केली. यावेळी त्यांच्यात विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली. विशेषत: ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर सुनक यांच्याशी ही त्यांची पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटद्वारे या भेटींबद्दल माहिती दिली. जी २० चे अध्यक्षपद भारताकडे येणार असून गौतम बुद्ध व महात्मा गांधी यांच्या पवित्र भूमीतून शांततेचा सशक्त संदेश देण्यावर सर्वजण सहमत होतील, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

मोदींनी घेतला ढोलवादनाचा आनंद

‘जी २०’ शिखर परिषदेनिमित्त इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायातील व्यक्तींसह ढोल वाजविण्याचाही आनंद घेतला. यावेळी पारंपरिक भारतीय वेशभूषा व पगडी घातलेल्या व्यक्तींनी मोदी यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच ‘भारत माता की जय’च्या घोषणाबाजीत त्यांचे स्वागत केले. यावेळी तालबद्ध रीतीने ढोलही वाजविला जात होता. मोदींनीही त्यात सहभागी होत काही वेळ ढोल वाजविला. त्यामुळे, वादकांसह अवघ्या भारतीय समुदायाचा आनंद द्विगुणित झाला.

जागतिक अर्थव्यवस्था आणि आर्थिक मुद्दांवर चर्चा करून आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी ‘जी-२०’ या संघटनेची स्थापना १९९९मध्ये झाली आहे. जगातील आर्थिक विकासाच्या प्रश्‍नावर विचारमंथन करणे आणि औद्योगिक क्षेत्रावर लक्ष देणे, हा १९ देश सदस्य असलेल्या या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचे मुख्य उद्देश आहे.

‘जी-२०’मध्ये सहभागा बहुतेक देश आर्थिकदृष्ट्या ताकदवान आहेत. लोकसंख्येचा विचार करता जगातील ६० टक्के लोकसंख्‍या या संघटनेच्या २० सदस्य देशांमध्ये राहत आहे. तसेच जी-२० देशांचा देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्ना (जीडीपी)तील हिस्सा जगाच्या एकूण ‘जीडीपी’च्या ८० टक्के आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर जगभरात होणाऱ्या निर्यातीपैकी ७५ टक्के निर्यात जी-२० देशांमधून होते.

सदस्य देश

अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपिय समुदाय. स्पेन या गटाचा स्थायी पाहुणा देश आहे.

१५ ते १६ नोव्हेंबर २०२२ - यंदाच्या १७ व्या परिषदेचा कालावधी

इंडोनेशिया - संघटनेचा अध्यक्ष देश

बाली (इंडोनेशिया) - परिषदेचे ठिकाण

जी-२० देशांचा ‘जीडीपी’ आणि दरडोई देशांतर्गत एकूण उत्पन्न (पर कॅपिटा जीडपी)

(आंतरराष्ट्री नाणेनिधीनुसार २०२२मधील सध्याची अंदाजे किंमत)