Ganeshotsav 2022 : दुर्गेच्या राज्यामध्ये गणरायाची क्रेझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Chaturthi Ganeshotsav 2022 Increase in demand for Ganesha idols Kolkata

Ganeshotsav 2022 : दुर्गेच्या राज्यामध्ये गणरायाची क्रेझ

कोलकता : देशात गणेशोत्सवाला आज जल्लोषात सुरूवात झाली. विशेषत: मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव लोकप्रिय आहे. मात्र, आता मुंबई, महाराष्ट्राच्या सीमा ओलांडत इतर राज्यांतही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तत्कालीन मुंबई प्रांतात लोकमान्य टिळकांनी बंगालमधील दुर्गापूजेच्या धर्तीवर सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. आता, नवरात्री व दुर्गापूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या प.बंगालमध्ये, विशेषत: राजधानी कोलकत्यातही गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत आहे. कालीमाता, दुर्गेबरोबर गणेशमूर्तीनाही मागणी वाढत आहे.

गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे, यंदा तो अधिक उत्साहात साजरा होतो आहे. कोलकत्यात गणेशमूर्तींना यंदा इतकी मागणी आहे, की शहरातील मूर्तीचे प्रमुख केंद्र असलेल्या कुमारतुलीमध्ये शिल्पकारांना शेवटच्या क्षणी आलेल्या ऑर्डर नाकाराव्या लागल्या. शिल्पकार संथान पाल म्हणाले, की गेल्या दहा वर्षांपासून कोलकत्याच्या उपनगरात गणेशपूजेचे प्रस्थ वाढत आहे. सामान्यत: मी नेहमी दुर्गेच्या मूर्ती बनवितो. मात्र, यंदा मला गणेशमूर्तींच्या अनेक ऑर्डर मिळाल्या. मध्य कोलकत्यातील मुरारीपुकुरमधील गणेश पूजा समितीचे सदस्य अभिषेक दास म्हणाले, की गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही १५ मित्र २००८ मध्ये सर्वप्रथम एकत्र आलो. वॉर्ड क्र.१४ मध्ये गणेशोत्सवाला सुरूवात केली तेव्हा शिल्पकार केवळ तीन गणेशमूर्ती बनवित असत.

तणाव, चिंतामुक्तीचा उपाय

समाजशास्त्राचे प्रा.डॉ. अंगशुमन सरकार म्हणाले, की कोलकत्यात जगधात्रीच्या पूजेतही वाढ होत आहे. लोक विविध समस्यांपासून मन वळविण्यासाठी तसेच दैनंदिन ताणतणाव, चिंता, असुरक्षिततेपासून सुटका करून घेण्यासाठी वेगवेगळ्या धार्मिक उपक्रमांत सहभागी होत आहेत. कोलकत्यात लवकरच दुर्गा पूजेप्रमाणे गणेशपूजाही मोठ्या प्रमाणावर साजरी होईल.

मी गेल्या ४० वर्षांपासून गणेशपूजेच आयोजन करत आहे. कोलकत्यात पूर्वी गणेशोत्सव फारसा साजरा केला जात नव्हता. मात्र, सध्या हे प्रमाण वाढत असून हा बदल स्वागतार्ह आहे. कोलकत्यातील अनेक शिल्पकारांना गणेशमूर्ती बनविण्याच्या ऑर्डर येत आहेत.

-बाबूआ भौमिक, गणेशभक्त, कोलकता

Web Title: Ganesh Chaturthi Ganeshotsav 2022 Increase In Demand For Ganesha Idols Kolkata

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..