
गंगेच्या आरोग्यासाठी डॉल्फिनचा अभ्यास
नवी दिल्ली : उत्तरभारताची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या गंगा नदीमधील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून या नदीचे आरोग्य तपासण्यासाठी आता डॉल्फिन आणि हिल्सा या दोन प्रजातीच्या माशांच्या जीवनचक्राचा अभ्यास केला जाणार आहे. ‘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा’ (एनएमसीजी) आणि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च- नॅशनल एन्व्हायरोन्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्था मिळून हा अभ्यास करणार आहेत.
एनएमसीजीचे संचालक जी. अशोक कुमार यांनी ही माहिती दिली. या संशोधनामध्ये डॉल्फिन आणि हिल्सा माशांच्या संख्येबाबतचे बायो इंडिकेटर आणि सुक्ष्मजीवांचा अभ्यास केला जाणार असून या माध्यमातून नदीचे आरोग्य नेमके किती सुधारले? हे पडताळून पाहण्यात येईल. या संशोधनामध्ये ज्या बायो इंडिकेटरचा गांभीर्याने अभ्यास करण्यात येईल त्यांचे संशोधनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे, असे संशोधकांनी सांगितले.
मानवी हस्तक्षेपाचा विपरीत परिणाम सुक्ष्मजीवांच्या जैवविविधतेवर होताना दिसतो ‘ई- कोलाई’चे उगमस्थान हे देखील गंगेमध्येच आहे, त्याचा देखील गांभीर्याने अभ्यास करण्यात येईल. याआधीही गंगेच्या पाण्याचा सखोल अभ्यास केला असता त्यातून देखील आश्चर्यकारक निष्कर्ष हाती आले होते. आता केले जाणारे संशोधन देखील हा याच प्रक्रियेचा भाग असल्याचे अशोककुमार यांनी म्हटले आहे.
‘ग्यान गंगा’वर संशोधनाचे भांडार
‘एनएमसीजी’च्या पुढाकाराने आतापर्यंत जे संशोधन करण्यात आले होते ते ‘ग्यान गंगा’ या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून या उपक्रमाच्या माध्यमातून संशोधन, धोरण, गंगेशी संबंधित ज्ञानाचे व्यवस्थापन आदी घटकांवर भर देण्यात येईल. हिल्सा माशांच्या पालनाबाबत सरकार गांभीर्याने पावले टाकत असून गंगेच्या मध्यभागामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येईल. आतापर्यंत सहालाखांपेक्षाही अधिक माशांचे पालन करण्यात आले असून पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या सीमेजवळ फराक्का बंधाऱ्याजवळ हे मासे आढळून आले असून तिथेच त्यांचे पालन केले जात आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
गंगेतील जैवविविधतेवरही भर
गंगेत असणाऱ्या जलचरांच्या जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासाठी ‘सेंट्रल इनलॅंड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या पुढाकाराने शोध प्रकल्प राबविला जात आहे. गंगेतील डॉल्फिन, मगरी, कासव आणि पक्षी यांची संख्या कशी वाढेल याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. याचबरोबर मच्छीमारांची रोजीरोटी कायम राहावी म्हणून देखील प्रयत्न केले जात आहेत. मागील चार वर्षांच्या काळामध्ये गंगेमध्ये १९० प्रजातींचे मासे आढळून आले आहेत.
Web Title: Ganga River Pollution Life Cycle Of Dolphin And Hilsa To Check Health Of The River Nmcg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..