गुलाम नबी आझादांनी काँग्रेसच्या पराभवावर सोडलं मौन; 72 वर्षातील सर्वात वाईट...

वृत्तसंस्था
Sunday, 22 November 2020

काँग्रेसचे वरिष्ठ नेता गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी बिहार विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवावर आपलं मौन सोडलं आहे

नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेता गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी बिहार विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवावर आपलं मौन सोडलं आहे. काँग्रेसच्या पराभवाला मी पक्षाच्या नेतृत्वाला जबाबदार धरणार नाही, पण आपण स्थानिक पातळीवर जनतेचा संपर्क गमावला आहे. जोपर्यंत आपण प्रत्येक स्तरावर कार्यशैलीत बदल करणार नाही, परिस्थिती बदलणार नाही, असं मत आझाद यांनी व्यक्त केलं आहे. 

गांधी परिवाराला आपण दोष देऊ शकत नाही. कारण कोरोना महामारीमुळे जास्त काही केलं जाऊ शकत नाही. पण, पक्ष नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी काही कार्यक्रम द्यावा आणि पदांसाठी निवडणुका घ्यायला हव्यात. सर्वांनीच पक्षावर प्रेम करायला हवं आणि त्याला मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असंही आझाद म्हणाले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांनी बिहार निवडणुकीतील पराभवानंतर समोर येत आपली मतं व्यक्त केले होते.

फाईव्ह स्टार संस्कृती सोडण्याची गरज

आज कोणत्याही नेत्याला तिकिट मिळते तेव्हा तो 5 स्टार हॉटेल बुक करतो. रस्ता खराब असेल तर नेते तिकडे जातच नाहीत. पक्षाने ही संस्कृती सोडायला हवी. कारण तोपर्यंत आपल्याला निवडणूक जिंकता येणार नाही, असा सल्ला आझाद यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले की, ''जोपर्यंत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत त्यांना आपली जबाबदारी समजणार नाही. जेव्हा सर्व पदाधिकाऱ्यांची निवड होईल, तेव्हा त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होईल. आज पक्षात कोणीही कोणतेही पद मिळवू शकते.'' 

72 वर्षातील सर्वात वाईट कालखंड

गुलाम नबी आझाद यांनी सध्याचा काळ हा 72 वर्षातील सर्वात वाईट असल्याचं म्हटलं आहे. गेल्या दोनवेळा काँग्रेस लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचा दर्जा मिळवण्या इतपतही संख्या गाठू शकला नाही. पण, लडाख पर्वतीय परिषद निवडणुकीत पक्षाने 9 जागा जिंकल्या, या सकारात्मक निकालांची अपेक्षा नव्हती, असंही ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghulam Nabi Azad said about congress party leadership