
जम्मू-काश्मीरचे पुढचे मुख्यमंत्री आझाद असतील; काँग्रेस नेत्याचं विधान
नवी दिल्ली - गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधील त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरचे माजी युवक काँग्रेस अध्यक्ष, अमीन भट्ट यांनी शनिवारी लक्षवेधी विधान केलं. “गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील”, असं अमीन भट्ट यांनी म्हटलं. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी गांधी कुटुंबावर आणि काँग्रेसच्या संघटनावर जोरदार टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. (Ghulam Nabi Azad news in Marathi)
माजी आमदार अमीन भट्ट यांनी शनिवारी आझाद यांची भेट घेतली. "आम्ही पुढील योजनांवर चर्चा करू, मात्र आम्ही भारतीय जनता पक्षाची (भाजप) बी टीम नाही," असे भट्ट म्हणाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात आझाद यांनी पक्षातून बाहेर पडण्यामागील कारणं स्पष्ट करत वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारणे आणि अनुभव नसणाऱ्यांच्या वाढत्या प्रभावावर नाराजी व्यक्त केली होती.
आझाद यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. देशात काँग्रेसच्या कमी होत चाललेल्या राजकीय प्रभावासाठी आणि निवडणुकीतील खराब कामगिरीसाठी राहुल यांची "अपरिपक्वता" कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले. मात्र आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचही आझाद यांनी स्पष्ट केलं.