
गोव्याची सूत्रे प्रमोद सावंतांकडेच..!
नवी दिल्ली : गोव्यात भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून देण्याच्या मोहीमेचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाची सूत्रे कायम ठेवण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. आज दुपारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर त्यांच्या गोव्यातील निकटवर्तीयांना ‘शपथविधीसाठी गोव्यात येत आहे,‘ असा संदेश त्यांच्या गोटातून देण्यात आला.
मणिपूरमध्येही एन. बिरेन सिंह यांच्याकडेच सूत्रे कायम ठेवण्यात येणार आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने तेथील मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे. गोवा व मणिपूरमध्ये १९ आणि २० मार्चच्या आसपास नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. गोव्यातील सावंत यांच्या नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नसतील असे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सावंत व बिरेन सिंह यांच्याशी चर्चा केली. उत्तराखंडचे काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनी चर्चा करून त्या राज्यातील पुढील मुख्यमंत्र्यांबाबत ‘विचार सुरू आहे’चा मेसेज दिला आहे.
गोव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला तेव्हा मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करतानाच,‘प्रमोदजी, आपल्याला स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर गोवा ही योजना आणखी वेगाने सुरू ठेवायची आहे,’ असे स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर सावंत यांनाच दिल्लीत काल बोलावून घेतले तेव्हाच पुन्हा हे पद मिळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज सावंत यांनी मोदींशी चर्चा केली.
गोव्यात आतापर्यंत भाजपला जास्तीत जास्त १३ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र भाजपने सर्वाधिक २० जागा मिळविल्या. मात्र विश्वजित प्रतापसिंग राणे आणि माविन गुदीन्हो आदी इच्छुकांनीही मुख्यमंत्रिपदासाठी हालचाली सुरू केल्याने गोव्यातील गूढ वाढले होते. सत्ता येणार हे निश्चित होऊन पाच दिवस उलटले तरी भाजपने सरकार स्थापनेचा दावा दाखल न केल्याने सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
नाराजी वगैरे आम्ही पाहतो
डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. सुरवातीची चर्चा झाल्यावर अन्य नेते बाहेर गेले त्यानंतरही पंतप्रधानांनी सावंत यांच्याशी एकट्याशी बातचीत केली. त्यातही ‘आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण गोवा‘ या योजनांबाबत मोदींनी सावंत यांना काही टिप्स दिल्याचे समजते. नाराजी वगैरेची चिंता तुम्ही करू नका, ते आम्ही पहातो, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहा यांनी सावंत यांना आश्वस्त केल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. फडणवीस यांनी सुरवातीपासूनच सावंत यांनाच कौल दिला होता.
Web Title: Goa Cm Pramod Sawant Swearing Bjp Pm Narendra Modi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..