
बिहारच्या जामुईमध्ये होणार सोने उत्खनन
पाटणा - जामुई जिल्ह्यात देशातील सर्वांत मोठ्या सोन्याच्या खाणीमध्ये उत्खनन करण्यासाठी बिहार सरकारने परवानगी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भागामध्ये २२२.८८ दशलक्ष टन सोन्याबरोबरच ३७.६ टन एवढे लोह खनिज असल्याचे ‘जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने (जीएसआय) केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
राज्याचा खाण आणि भूगर्भ विभाग अन्य केंद्रीय शोध संस्थांच्या संपर्कात असून जीएसआय आणि राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ संस्थांसोबत यासाठी बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआधी काही दिवसांपूर्वी ‘जीएसआय’ने कारमातिया, झाझा आणि जामुई जिल्ह्यातील सोनो या भागांमध्ये केलेल्या पाहणीत सोन्याचे साठे असल्याचे उघड झाले होते, असे अतिरिक्त मुख्य सचिव कम खाण आयुक्त हरजोत कौर बामराह यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘‘ प्राथमिक टप्प्यातील उत्खनन करण्यासाठी राज्य सरकार हे केंद्रीय संस्थांसोबत महिनाभरात करार करेल. ’’
बिहारमध्ये ४४ टक्के सोने
केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मागील वर्षी लोकसभेमध्ये दिलेल्या माहितीत बिहारमध्ये सर्वाधिक सोन्याच्या खाणी असल्याची माहिती दिली होती. बिहारच्या जमिनीमध्ये तब्बल २२२.८८५ दशलक्ष टन एवढे सोने आहे. देशातील एकूण साठ्याशी तुलना केली असता हे प्रमाण ४४ टक्के एवढे भरते.
Web Title: Gold Mining To Take Place In Jamui Bihar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..