गौरी लंकेश हत्या प्रकरणः बेळगावात "एसआयटी'कडून तरुणाची चौकशी 

संजय सूर्यवंशी
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

बेळगाव - गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक आज पुन्हा बेळगावात दाखल झाले. महाद्वार रोडवरील एका तरुणाने मारेकऱ्यांना जेवण व आसरा दिल्याचे तपासात समोर आल्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सदर तरुण स्वतःहून पथकाला शरण आला. महामार्गावर ढाबा चालवत असून, तो एका हिंदूत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असल्यामुळे या तपासाला महत्व आले आहे. 

बेळगाव - गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक आज पुन्हा बेळगावात दाखल झाले. महाद्वार रोडवरील एका तरुणाने मारेकऱ्यांना जेवण व आसरा दिल्याचे तपासात समोर आल्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सदर तरुण स्वतःहून पथकाला शरण आला. महामार्गावर ढाबा चालवत असून, तो एका हिंदूत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असल्यामुळे या तपासाला महत्व आले आहे. 

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तीनवेळा पथक बेळगावात दाखल झाले आहे. आज पुन्हा त्यांनी बेळगावात चौकशीला प्रारंभ केला. या प्रकरणाचा मास्टरमाईंड अमोल काळे, हल्लेखोर परशराम वाघमारे याच्यासह अटक केलेल्या संशयितांकडून अधिकाधिक माहिती जमविणे सुरू आहे. या तपासात मारेकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यात वारंवार विसावा घेत येथे जेवण केल्याचे सांगितले. तो ढाबा महाद्वार रोडवरील संभाजी गल्लीतील एका तरुणाचा असल्यामुळे आज पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या तरुणाला बोलावल्यानंतर तो स्वतःहून हजर झाला.

यावेळच्या तपासात ते धर्मप्रसारक म्हणून आपल्या ढाब्यात येत होते, जेवण करीत होते व काही काळ थांबून निघून जात होते. शिवाय धर्मप्रसारक असल्याने व आपणही एका हिंदूत्ववादी संघटनेत कार्यरत असल्यामुळे त्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील केली होती. ते आरोपी आहेत किंवा त्यांचे कोणाला तरी मारण्याचे नियोजन सुरू आहे, याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही.

इतर ग्राहकांना जसे जेवण पुरवत होतो तसे एक ढाबा चालक म्हणून त्यांना जेवण दिले. हिंदू धर्मप्रसारक म्हणून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली, इतकाच या घटनेशी आपला संबंध असून, थेट काहीही संबंध नाही, असे या तरुणाने सांगितल्याचे समजते. 

अतिथीगृहासमोर माध्यम प्रतिनिधी 
या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला कॉलेज रोड जवळील पोलीस अतिथीगृहात चौकशीसाठी आणणार असल्याचे समजल्यानंतर येथे माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने जमले. याची माहिती पथकाला लागल्यानंतर त्यांनी त्याची परस्पर बाहेरच चौकशी केली. यानंतर या तरुणाला एपीएमसी रोडवरील एका वकीलाच्या घरी नेऊन त्या ठिकाणी कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. येथेच तरुणाच्या नातेवाईकांना बोलावून घेतले होते. यानंतर या तरुणाला ताब्यात घेऊन पथक येथून निघून गेले. 

पथक पुन्हा खानापूरला
ताब्यात घेतलेल्या तरुणाचा पूर्वी चिखले  (ता. खानापूर) येथे ढाबा होता. येथेही  मारेकर्‍यांनी भेट दिल्याचा संशय पथकाला आहे. त्यामुळे या तरुणाला सोबत घेऊन  एसआयटी पथक खानापूर तालुक्यात निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.

कलखांबचा तरुण ताब्यात 
या प्रकरणाशी संबंधीत आणखी चार तरुण एसआयटी पथकाला हवे आहेत. गेल्या आठवड्यात जेव्हा पथक बेळगावात आले होते तेव्हा कलखांब येथील एका तरुणाला पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केल्याचे समजते. हलगा येथील परशराम नामक तरुण व आणखी दोघेही पथकाला हवेत आहेत. परंतु, इतर तिघेजण फरारी असल्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे. 

Web Title: Gouri Lankesh Murder case SIT Investigation in Belgaum